चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल; अटक आणि ७ दिवसांची पोलीस कोठडी
राजापूर : मुंबई – गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी महिंद्रा थार या चारचाकी गाडीने पत्रकार शशिकांत शंकर वारीशे ( 45 रा. कशेळी) यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली होती. या अपघातात शशिकांत वारीशे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मुख्यमंत्री-सचिवालय-कक्/
राजापूर पोलिसानी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असुन आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . याबाबतची फिर्याद अपघातील मयत यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले, राहणार तेली आळी रत्नागिरी यानी राजापूर पोलासात दाखल केली आहे. राजापूर पोलिसानी थार गाडीचा चालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर याच्यावर भा द वि कलम ३०८ , व सदोष मनुष्यवधाचा कायदा कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे . आज मंगळवारी पंढरीनाथ आंबेरकर याला राजापूर पोलिसांनी अटक करत राजापूर न्यायालयात हजर केले असता राजापूर न्यायालयाने त्याला दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सात दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे .
अपघातात गंभीर जखमी वारीशे यांना रत्नागिरी येथून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पुढील उपचारासाठी कोल्हापुरातीलच सिटी हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे
मुंबई गोवा महामार्गावर कोदवली येथील पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगात महिंद्रा थार या गाडीने पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या गाडीला पेट्रोल पंपातुन बाहेर पडताना जोरदार धडक दिली. या धडकेत वारीशे हे दुचाकीवरून खाली पडले तर त्यांची दुचाकी थार गाडीबरोबर फरफटत सुमारे 200 ते 250 फुट पुढे फरफटत गेली. यात वारिशे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर हे अधिक तपास करत आहेत.


