रत्नागिरी- रत्नाागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार दोन दिवसांत म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जाहीर होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात भाजप बूथ कार्यकर्ता संमेलन झाले, यावेळी राणे बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळ माने, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अॅड. बाबा परुळेकर, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष समीर वस्ता, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान मोदींच्या कार्याचा गौरव करतानाच त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली. हा जाहीरनामा म्हणजे निव्वळ थापा आहेत. आता काँग्रेसवाले १ लाख रुपये गरीब कुटुंबाला देणार असल्याचे सांगत आहेत. गेल्या ६० -६५ वर्षातील सत्ताकाळात १० हजार रु.पण देता का आले नाहीत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. https://sindhudurgsamachar.in/सोन्याने-मोडले-सर्व-रेकॉ/
पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य दिले. राम मंदिर बांधले. भारताची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर आणली. पुढील पाच वर्षांमध्ये देशाला तिसरी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत महासत्ता बनवण्याचे ध्येय ठेवणार्या, सर्व समाजाच्या विकासाचे भान राखणार्या मोदींना तडीपार करण्याची भाषा केली जात आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील दहा आमदार भाजपात येणार असल्याचे सांगून त्यानंतर ठाकरेच तडीपार होणार असल्याचा दावा केला. त्यामुळे मतदारांनी ठाकरेंचे उमेदवार मत मागण्यास येतील तेव्हा त्यांना दारात उभे करू नका, असे आवाहनही मतदारांना केले. याच उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला मुंबईतून तडीपार केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला एका उंचीवर नेवून ठेवले. देशाची प्रतिष्ठा वाढवणार्या, देश सुरक्षित करणार्या पंतप्रधानांना जगातील एक कर्तृत्ववान नेता म्हणून सर्वच देशांनी मान्य केले. त्यामुळे आता ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. तिसर्या वेळी मोदींना पंतप्रधान बनवून मतदारांनी विकसित देश निर्मितीसाठी हातभार लावावा, असे आवाहनही ना. नारायण राणे यांनी केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी आपल्या राजकीय कारकिर्दीत केलेल्या कामांची यादी सांगितली. रत्नागिरी-सिंधुदुर्गातील लोकांची नोकरी करण्याची मानसिकता बदलली पाहिजे, असे सांगून ना. राणे यांनी आता कोकणवासीयांनी नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळावे, असे आवाहनही केले.