Kokan: माझे कोकण, माझे स्वर्ग !

0
14
कोकण,,
माझे कोकण, माझे स्वर्ग

सिंधुदुर्ग– पूर्वी कोकण गरीब होतं… गावे भोळी-भाबडी, साधी होती… माणसे गरीब होती… प्रेम आपुलकी होती… शेती करून पोट भरत होतो… भात, नाचणी, वरी, कुळीथ, उडीद, हरिक ही पीक पिकवून बाराही महिन्याचे दिवस उजळलेले असायचे… नानातऱ्हेच्या भाज्यांची तर कमतरता नव्हती… परसवनात आठ दिवसाने टोपलीभर भाजी तयार होत होती… शेतीला जोडव्यवसाय म्हणून डझनभर गुरेढोरे होती… घरात घागरभर दूध दुभत होतं आणि कोणाकडे नसेल तर मागील दाराने शेजाऱ्याकडून चहा पुरते आणून पाहुण्यांचे आदरातिथ्य होत होतं… डालगाभर कोंबड्याही होत्या… घरात सात आठ माणसे असूनही तीन वेळच कसंबसं पोटभर अन्न मिळत होतं… पेज, जाडा तांबडा भात, हरकाचा भात, नाचण्याची भाकरी, कुळथाची पिटी आणि कधी ना कधी सुकी भाजलेली तारली किंवा बांगडा खाऊन मन तृप्त होत होतं… त्याला अमृताची चव येत होती आणि रात्री निजताना डोक्यावर पळीभर खोबरेल तेल घसघसून घासायला मिळाले की आम्ही ऐहिक जगातल्या सुखाच्या राशीवर लोळत होतो…https://sindhudurgsamachar.in/kokan-रत्नागिरी-जिल्ह्यातील-४/

ते दिवस मंतरलेले होते… पैसा गाठीला नसला तरी ते वैभव आणि खरी श्रीमंती होती… दरम्यानच्या काळात आम्ही परंपरे प्रमाणे मुंबईत आलो आणि मुंबईतल्या जीवनशैलीचे गावाला बरे वाईट परिणाम दिसू लागले… गेल्या काही वर्षात हळू हळू कोकणची जीवनशैली बदलू लागली आणि आमचे भोळे भाबडे गाव हरवून बसलो… गावात शहरी जीवनशैलीचं अनुकरण होऊ लागलं… आता तसेच झाल्याचे दिसून येते… दिवस बदलत आहेत… गावात सरकारच्या आशीर्वादाने पिवळ्या आणि केसरी रेशनकार्डावर तीन रुपयात तांदूळ आणि दोन रुपयात किलोभर गहू मिळू लागले आणि नाचणी, वरीची भाकरी मागे पडत चपाती दिसू लागली… हरिक, वरी ही कॅल्शियम युक्त धान्ये जवळ जवळ संपून गेली… आता तर आम्ही जमिनीच संपवायला निघालोय, परप्रांतियांच्या घशात घालून.!

चहापुरते दूध, सारवायला शेण हवे म्हणून गुरे ठेवून कुठेतरी भात शेती दिसतेय… पण ती करताना आधुनिक यंत्राने करू लागलो… कोल्हापूरवरून येणारे वारणा आणि गोकुळ दूध व घाटावरच्या भाजीवर कोकण जगू लागले…

सर्वसाधारणपणे सध्या मुंबईची जीवन शैली तीच कोकणची जीवन शैली बनू लागली आहे… गावची माणसे अलीकडे कामे सोडून टीव्ही सिरियल्स, मोबाईल यामध्ये गुंतलेली आहेत… आम्ही गाव सोडून मुंबईला आलो, याचे दुःख अजिबात नाही त्यामुळे प्रगती झाली, याचे समाधान जरूर आहे… पण माझे भोळेभाबडे गाव आता कायमचे हरविले याचे शल्य माझ्या मनात कायम राहणारे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here