सुनिता भाईप/ सावंतवाडी-
चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे न्हावेली-पाडलोस-मडुरा रस्त्यावर पाडलोस येथे मोरीपुल कोसळून वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. मार्गाच्या एका बाजूला दोन वर्षांपूर्वी पडलेले मोठाले भगदाड तर दुसऱ्या बाजूला पावसात कोसळलेले मोरीपुल अपघातास निमंत्रण देत आहे. अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी केवळ पट्टी बांधण्याचे काम केले आहे. परंतु यावर अपघात टळेल का, असा सवाल पाडलोस ग्रामस्थांनी संबंधित विभागास केला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-सोनवडे-तर्फ-हवेली-येथील-र/
पाडलोस येथे मराठी शाळेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरीपुलावर दोन वर्षांपूर्वी भगदाड पडले होते. याकडे संबंधित विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले. गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कमकुवत झालेल्या पुलाची भिंत कोसळली. येथून दररोज पहिली ते चौथी मधील शाळकरी मुले पायी चालत ये जा करतात. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक यांच्यासह विद्यार्थ्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सुरक्षेसाठी केवळ पट्टी बांधून विभागाची जबाबदारी संपते का? तत्काळ तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना का होत नाही? कमकुवत पुलाच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षे का लागतात? अधिकारी वरिष्ठांना तालुक्यातील कमकुवत पुलांचा अहवाल का देत नाहीत? अशा धोकादायक पुलांसाठी निधी नसतो का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांमधून विचारले जात आहेत. तसेच प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी पाडलोस ग्रामस्थांनी केली आहे.
..तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार
पाडलोस-मडुरा मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. एखादी घटना घडून दोन वर्षे उलटतात परंतु झोपी गेलेल्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही. कोसळलेले मोरीपुल धोकादायक स्थितीत आहेत. याठिकाणी अपघात झाल्यास कामचुकार अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार असल्याचा इशारा, पाडलोस उपसरपंच राजू शेटकर यांनी दिला आहे.