⭐उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
सिंधुदुर्ग- अभिमन्यू वेंगुर्लेकर
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ मार्फत पात्र महिलांना प्रति महिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, एका कुटुंबातील किती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात? याबद्दल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-पटसंख्या-कमी-असलेल्या-शा/
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना घोषित केल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत काल काही बदल करण्यात आले आहेत. २१ वर्षांपासून तर ६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना १५०० रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ५ एकर शेतीची अटही काढून टाकण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यासोबतच उत्पन्नाच्या दाखल्याची अटही काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे मी सर्व भगिनींना विनंती करतो की, कोणीही एजंटच्या मागे लागू नका. एजंट येत असल्यास तक्रार करा” अशी माहितीही त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, “या योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून एका कुटुंबात दोन महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. एक विवाहित असल्यास एका अविवाहित महिलेलादेखील हा लाभ देण्यात येणार आहे,” असेही त्यांनी सभागृहात सांगितले.
अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला. काल त्याला नोकरीतून निलंबित केले. त्याला बडतर्फ करण्याचाही विचार सरकार करत आहे. त्याशिवाय सेतू केंद्र किंवा अंगणवाडी सेविकांनी या योजनेत मदत करावी; म्हणून प्रती फॉर्म ५० रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे. यावर जर कुठला सेतूकेंद्र चालक पैसे घेत असेल आणि त्याचा पुरावा समोर येईल, त्या सेतू केंद्र चालकाचा परवानाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे आदेश काढले आहेत. या सगळ्या गोष्टी शक्य तितक्या ऑनलाईन करण्याचा आपला प्रयत्न आहे. यामुळे जास्त वेगाने पैसे देता येतील. सुरुवातीच्या काळात एकाच वेळी जास्त लोक तिथे अर्ज दाखल करण्यासाठी येतात. त्यामुळे सर्व्हर स्लो झाल्याचं पाहायला मिळतंय. पण आता त्याही अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जातील”, असे ते म्हणाले.