⭐ तहसीलदार ओतारी यांनी कुटुंबीयांचे केले सांत्वन ⭐ शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई आणि इतर सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून मिळवून देण्यात आली मदत
परुळे: चिपी भरणीवाडी येथील पांडुरंग दशरथ वाक्कर (वय ५०) यांचा सोमवारी ओहोळात पाय घसरून पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबासाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. शासनाने तातडीने दिलेल्या चार लाख रुपयांच्या आर्थिक मदतीने कुटुंबाला थोडासा दिलासा मिळाला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मुसळधार-पावसामुळे-म्हाप/
यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी, तलाठी दिगंबर डवरे, कोतवाल आर. वरक, आणि संदीप परब उपस्थित होते. तहसीलदार ओतारी यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करताना त्यांची वेदना अनुभवली. पांडुरंग वाक्कर हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबाचा आधारच गेला.
घटना घडलेल्या दिवशी पांडुरंग कामावरून घरी येताना ओहोळातून जात होते, तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने ते पुराच्या पाण्यात वाहून गेले. सायंकाळी घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर, ग्रामस्थांनी दोनशे मीटर अंतरावर ओहोळात त्यांचा मृतदेह सापडला.
निवती पोलीस स्टेशनला माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड घटनास्थळी आले आणि पंचनामा केला. शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, चिपी ग्रामपंचायत माजी सदस्य संदेश करंगुटकर आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पांडुरंग वाक्कर यांचा मृतदेह ओरोस येथील शवगृहात ठेवण्यात आला आणि नंतर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पांडुरंग वाक्कर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आणि इतर कुटुंबीय आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. पांडुरंग वाक्कर हे त्यांच्या कुटुंबाचा एकुलता एक आधार होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती आणखीनच बिघडली आहे. ग्रामस्थांनी शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी केली होती. शासनाने तातडीने दखल घेऊन मदत दिली, त्यामुळे कुटुंबाला थोडासा आधार मिळाला आहे, पण त्यांचा आप्तस्वकीय परत येणार नाही, ही वेदना कुटुंबीयांसाठी असह्य आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण, पाट, परुळे, केळूस आणि आजूबाजूच्या डोंगर-दिरीत वसलेल्या गावांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक घरांवर झाडे आणि माड कोसळल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. पाऊस न थांबल्याने या भागात अधिक नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.
स्थानिक आणि तालुका पातळीवरील नेते आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पडझड झालेल्या घरांच्या नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत, ताडपत्री, मेनकापड आणि इतर आवश्यक वस्तू मिळालेल्या नाहीत. पंचनामे पूर्ण होईपर्यंत प्रशासन काहीही मदत देऊ शकत नाही, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नुकसानग्रस्तांची परिस्थिती अधिकच बिकट होताना दिसत आहे, आणि यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अशी खंत तालुक्यातील जनतेकडून व्यक्त होत आहे. शासनाकडून यंदाच्या गणेशउत्सवा आधी आर्थिक मदत मिळाल्यास नुकसानग्रस्थाना दिलासा मिळणार आहे.