Kokan: विजेचा झटका जीवाला फटका- विद्युत सुरक्षेचे नियम पाळा आणि अपघात टाळा

0
42
महावितरण,
सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत

 रत्नागिरी: व‍िद्युत ही वापरासाठी सुरक्षित आहे. परंतू निष्काळजीपूर्वक पध्दतीने हाताळल्यास ती धोकादायक बनते. परिणामी  अपघाताच्या घटना घडतात. त्यात शॉर्टसर्किट होऊन आग लागणे, आर्थिक नुकसान होणे, विजेच्या धक्क्याने अपंगत्व वा मृत्यु ओढवणे अशा घटना घडतात. विजेपासूनचा हा धोका टाळता येणे शक्य आहे. त्याकरिता योग्य दर्जाची  विद्युत उपकरणे व साहित्याचा वापर, सुव्यवस्थित वायरिंग व विद्युत संच मांडणी, सुरक्षा साधनांचा वापर, नियमित देखभाल-दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

विजेची निर्मिती, वहन ते वापर या दरम्यान विजेमुळे होणाऱ्या अपघाताच्या घटनेस विद्युत अपघात म्हणतात.  विजेचा प्रवाह, दाब, रोध, वेळ, वारंवारता व तरंग ही परिमाणे होणाऱ्या इजेचे, दुखापतीचे, हानी वा नुकसानीचे निर्धारक आहेत. 6 मिलीॲम्पिअरपर्यंतचा विजेचा प्रवाह धोकादायक नाही. 30 मिलीॲम्पिअर वीज प्रवाहाचा धक्का लागल्यास मृत्यु ओढवतो. 25 मिलीॲम्पिअर वीज प्रवाहाचा धक्का लागल्यास श्वसन मार्गाच्या स्नायुचा धर्नुवात, सलग तीन मिनिटे या क्षमतेच्या वीजप्रवाहाच्या संपर्कात आल्यास ह्रदयाक्रिया बंद पडू शकते. श्वासोच्छ्वास गुदमरल्यानेही मृत्यु ओढवू शकतो. अशा व्यक्तिस तीन मिनिटाच्या आत तोंडाव्दारे श्वास दिल्यास प्राण वाचू शकतात.

विद्युत धोक्याची अंतर्गत कारणे पुढीलप्रमाणे आहेत. अति वीजदाब, अति वीजप्रवाह, वीज प्रवाहात गळती (करंट लिकेज), शॉर्टसर्किट (वीज योग्य मार्गाने जाऊ शकत नाही), विद्युत रोधक द्रव्यांची गळती, विद्युत उपकरणे वा रोधकांचे गरम होणे/ जळणे परिणामी विषारी वायूंचे उत्सर्जन, आग लागणे, ज्वलनशील घटकांचा स्फेाट, हायड्रोजन वा इतर वायूंची निर्मिती होऊन स्फोटक वायु मिश्रण तयार होते. 

विद्युत धोक्याची बाह्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत. यांत्रिक घटक जसे की अडथळा, पडणे, कंपन होणे, नैसर्गिक वा कृत्रिम विकिरणे, आर्द्रता, अति तापमान इ. भौतिक व रासायनिक घटक, वादळवारा, हिमवृष्टी, विजा चमकणे, प्राण्यांकडून वीजवाहक वायर्स/वाहिन्यांस व रोधक आवरणास क्षती, बेफिकिर, अज्ञानी व निष्काळजीपणे काम करणे.

विद्युत अपघाताच्या घटना टाळण्यासाठी सर्किट ब्रेकर्स (एमसीबी/ इएलसीबी) बसविणे, रिलेज व फ्युजेसचा वापर करणे, आर्थिंग सुस्थितीत ठेवणे या सुरक्षा/ संरक्षक उपाययोजना आहेत. ‘प्रतिबंध हाच उपाय’ या तत्वाचा अवलंब करून मानवी जीवनास होणारा धोका टाळणे शक्य आहे. वार्षिक तपासणी सूचीप्रमाणे सेवा जोडणी (सर्व्हिस कनेक्शन),मेन स्वीच बोर्डअंतर्गत वायरिंग व रोधक आवरणआर्थिंगस्वीचेस व फ्युजेसपोर्टेबल विद्युत उपकरणेअग्निशमन साधने या बाबींची तपासणी करून घ्यावी.

औद्योगिक आस्थापना / कंपन्यातील कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा संकेतासह प्रमाणित कार्यपध्दतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्याव्दारे संभाव्य धोके टाळण्यास मदत होते. विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने काय करावे व काय करू नये या संदर्भातील मार्गदर्शक सुचना देणे त्याचे फलक प्रदर्शित करणे, योग्य कार्यपध्दतीचे मार्गदर्शन, सराव प्रात्यक्षिके व कवायती घेणे, विद्युत उपकरणे हाताळणी व सुरक्षा साधनांच्या वापराबाबत सजग करणे, विद्युत अपघात, अग्निउपद्रव इ. घटनांचा सामना करण्याच्या व्यवहार्य पध्दती, प्रथमोपचार, कृत्रिम श्वासोच्छ्वास कसा द्यावा याबाबतचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

विद्युत सुरक्षेसाठी लक्षात ठेवा. स्वीच हे न्युट्रलऐवजी, फेजवायर्संना असावे. थ्री पिन प्लग व सॉकेटचा वापर करावा.जोड वायर्स / केबलचा वापर टाळावा. अतिभार व शॉर्टसर्किटपासून सुरक्षिततेसाठी एमसीबी वापरावा. ओल्या हातांनी  उपकरणे चालू बंद करणे किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका.  सर्व धातूयुक्त भाग योग्य पध्दतीने आर्थिग केलेले असावे. चालू स्थितीतील कोणतेही उपकरण एका जागेहून दुसरीकडे हलवू नये. योग्य दर्जा व क्षमतेच्या फ्युजचा वापर करावा. वायर्सची रोधक आवरण क्षमता योग्य व सुस्थितीत असावी.  विद्युत रोहित्रे, ऑईल व विद्युत उपकरणांच्या परिसरात नो स्मोकिंग झोन असावा. विद्युत केबल व पॅनेल बोर्डजवळ पाण्याची गळती होणार नाही,याची दक्षता घ्यावी. विद्युत पॅनेलसमोर रबरशीट अंथरलेली असावी. विद्युत पॅनेल व संच मांडणीजवळ वाळूने भरलेल्या बादली व अग्निशमक उपकरणे ठेवलेली असावी. कमी गुणवत्तेची व रोधक आवरण नसलेली वा कमकुवत झालेले प्लायर्स व स्क्रु ड्रायवर वापरू नयेत. दोन भिन्न  क्षमतेच्या वायर्सचे जोड वापरू नये. लुज कनेक्शन मुळे वीज दाबात घट होऊन स्पार्किंग होते. परिणामी आग लागणे, फ्लॅश होणे व अपघाताच्या घटना घडतात. तेंव्हा लुज कनेक्शन होणार नाही याची खबरदारी घ्यावी.  सॉकेट व विजेचे पाँईंट्स अतिभारीत करू नयेत. केबलमधील वायर्समध्ये जोड देताना ते स्टॅगर्ड / असमांतर असावेत. विद्युत पॅनेलचे दरवाजे बेद ठेवावेत. विजेची उपकरणे चालू बंद करताना हात कोरडे असावेत. कोरडे रबरी चप्पल वा बुट वापरावा. स्वीच तुटलेले/ फुटलेले नसावेत. ते कोरडे असावेत. वीजविषयक काम करताना पुर्ण वेळ पुर्ण लक्ष केंद्रीत करून करावे.

विद्युत खांबाला व ताणाला गुरे, जनावरे बांधू नयेत. विद्युत वाहिन्यांखाली गोठे, घराचे बांधकाम करू नये. कडब्याची गंजी उभारु नये. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेती पंप, स्टार्टर, विजेच्या मीटर बाबत दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी पाऊस सुरू असताना वा ओल्या हातांनी विद्युत पंप चालू वा बंद करू नये. वादळ वारा वा पावसामुळे विद्युत वाहिनींवर झाड वा झाडांची फांदी तुटून पडणे, विजेच्या तारा तुटणे, विजेचे खांब वाकणे वा पडणे, वितरण रोहित्र (डिपी स्ट्रक्चर) वाकणे वा पडणे असे प्रकार घडतात. तेंव्हा नजिकच्या महावितरण कार्यालयास कळवावे. त्यांना स्पर्श करू नये. विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. एखाद्यास विजेचा धक्का बसल्यास त्या व्यक्तिस स्पर्श न करता त्यास कोरड्या लाकडाने बाजुला करावे, त्वरित कृत्रिम श्वासोच्छ्वास देत रूग्णालयात घेऊन जावे.

              पावसाळ्याच्या दिवसात वादळ वाऱ्यामुळे विद्युत यंत्रणेतील वीज खांब वाकणे/ पडणे, वीज तारा तुटणे, रोहित्रे जळणे, पडणे यासह विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे 1912, 19120, 1800-233-3435 व 1800-212-3435 या 24 तास सेवेत असणाऱ्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. विद्युत पुरवठा खंडितची तक्रार नोंद करण्यासाठी ग्राहकांनी आपल्या महावितरणकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा. वीजग्राहकांनी, नागरिकांनी विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन करून योग्य ती खबरदारी बाळगावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here