कुडाळ येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन
प्रशासनाने कामावरून कमी केलेले ८५ अंगणवाडी कर्मचारी वैभव नाईक यांच्यामुळे पुन्हा सेवेत- कमलताई परुळेकर
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ

अंगणवाडी कर्मचा-यांची असलेली एकजूट कौतुकास्पद आहे. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभा ही संघटना लढा देत आहे. कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न सुटले आहेत, काही प्रलंबित आहेत. ते शासनाकडून सोडवून घेण्यासाठी लढा सुरूच ठेवा. सरकार तुमचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करेल. मात्र घाबरून न जाता आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यासाठी तुमची असलेली एकजूट अशीच कायम ठेवा. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/kolhapur-पंचायत-समित्यांसाठीच्य/
अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) संलग्न हिंद मजदूर सभा आयोजित अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्गचा रौप्यमहोत्सव रविवारी कुडाळ येथील श्री वासुदेवानंद ट्रेड सेंटर सभागृहात संपन्न झाला. अधिवेशनाचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते तर पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा निशा शिवूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंद मजदूर संघाचे कार्याध्यक्ष अशोक जाधव, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सरचिटणीस कमलताई परुळेकर, उपाध्यक्ष नितीन पवार, कार्याध्यक्ष किसनाबाई भानारकर, कोषाध्यक्ष संज्योती शिंदे, अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन रोहिणी लाड, व्हाईस चेअरमन शिला साळुंखे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी जि.प.सदस्य प्रदीप नारकर, शैलेंद्र खानविलकर, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पेडणेकर, चंद्रपूर अंगणवाडी कर्मचारी सभेच्या इम्रान कुरेशी आदींसह सिंधुदुर्गासह राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैभव नाईक पुढे म्हणाले, या जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कमलताई परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेली ही पतसंस्था आज मोठी झाली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कमलताई गेली कित्येक वर्षे लढा देत आहेत. तुम्हा सर्वानी सातत्याने लढा दिल्यानंतर सरकारने मानधन वाढ केली आहे. तुमचे काही प्रश्न सुटले आहेत, काही प्रलंबित आहेत. त्यासाठी तुम्हाला लढावे लागेल. तुमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत तुमचा हा लढा असाच संघटितपणे सुरू ठेवा. सरकार तुमचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करेल, मात्र घाबरून न जाता, आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. तुमच्या प्रश्नांबाबत आम्ही तुमच्या सोबत आहोत. लाडकी बहीण योजनेतून पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत, असे श्री.नाईक यांनी यावेळी सांगितले.
कमलताई परुळेकर म्हणाल्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवून न्याय मिळवून देण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने लढत आहोत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, त्यासाठी आम्ही लढतच राहू. न्याय मागण्यांसाठी संप केला म्हणून कोणाचीही नोकरी जात नाही. मागील वेळेस संप झाला, तेव्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. त्यांना कामावरून काढून टाकण्याची भिती दाखवण्यात आली. त्यावेळी माजी आमदार वैभव नाईक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहीले. संप करणे हा आमचा हक्क आहे, आमच्या हक्कावर कोणीही गदा आणू शकत नाहीत. तरीही 85 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून या सर्वांना परत कामावर घेण्यात आले आहे. सातत्याने त्यांचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सहकार्य असते. जिल्हा बँक संचालक ओटवणेकर यांनीही कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेसाठी मोलाचे योगदान दिले आहे.
निशा शिवूरकर म्हणाल्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मोठा लढा उभारावा लागणार आहे. सरकार पुढे हार मानायची नाही तर ताकदीने संघर्ष करुया. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा मिळत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहणार आहे.
श्री.ओटवणेकर म्हणाले, कमलताई परुळेकर या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांची जिद्द व कर्तृत्व मोठे आहे. तुमच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्रासह दिल्लीपर्यंत त्यांनी वेळोवेळी मोर्चे काढले, आंदोलने केली आहेत. सहकारी पतसंस्था चालविण्यात त्यांचे कार्य मोठे आहे. आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून या पतसंस्थेसाठी सहकार्य केले, ते आमचे कर्तव्य होते.
श्री. जाधव म्हणाले. खऱ्याअर्थाने अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला संघर्ष करून आमची ताकद दाखवून देऊया, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक व बॅक संचालक श्री. ओटवणेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कमलताई परुळेकर आणि पतसंस्थेच्या यशात योगदान दिलेल्या पतसंस्थेच्या माजी चेअरमन शैलजा कांबळी, शालिनी तारकर, सविता कांबळी व विद्यमान चेअरमन लाड यांचा अध्यक्षा शिवूरकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. पतसंस्थेच्या कार्याचा आढावा चेअरमन लाड यांनी घेतला. यावेळी विविध ठराव घेण्यात आले.