दापोली- सध्याच्या काळात वाढदिवस हा एक ‘ इव्हेंट ‘ झाला आहे. बर्थडे केक, मित्रमंडळी, भेटवस्तू, जेवण खाणे वगैरे पाहता वाढदिवस म्हणजे केवळ ‘ पार्टी ‘ असते असे चित्र सर्वत्र पहावयास मिळते. मात्र दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील सृष्टी बैकर यांनी तसेच पुर्वा जगदाळे या मुलीने त्यांचा वाढदिवस वरील सर्व सोपस्कार बाजूला ठेवून शाळेत वृक्षारोपण करून व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. https://sindhudurgsamachar.in/उत्तराखंड-गौरीकुंडमध्य/

चंद्रनगर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या असलेल्या सृष्टी बैकर यांनी त्यांचा वाढदिवस अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. वाढदिवसानिमित्त इतर कार्यक्रम साजरे करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या बालपणी ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्याच शाळेत त्यांनी त्यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा करायचे ठरवले. शालेय बागेत सोनचाफ्याच्या झाडाचे रोपण करून त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. या झाडाचे संगोपन व काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी याच शाळेत इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या सौम्या बैकर या मुलीकडे सोपवली. वाढदिवसानिमित्त त्यांनी शालेय मुलांना खाऊवाटपही केले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, शिक्षक बाबू घाडीगांवकर, अर्चना सावंत, मनोज वेदक, ग्रा. पं. कर्मचारी सुप्रिया परब तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते. याच शाळेत इयत्ता सातवीत शिकत असलेली विद्यार्थिनी पुर्वा जगदाळे हिचाही याच दिवशी वाढदिवस होता. तिचे वडील सचिन जगदाळे यांनी तिच्या वाढदिवसाचा घरगुती कार्यक्रम रद्द करून या दिवशी शालेय मुलांच्या दुपारच्या जेवणासोबत पूरक आहार म्हणून राजगिरा लाडू वाटप केले. नेहमीपेक्षा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजऱ्या केलेल्या या वाढदिवसाचे अनेकांनी कौतुक केले आहे.


