सिंधुदुर्ग मंडळ: महानिर्मितीचा राज्याच्या वीज निर्मितीमधील वाटा आता ४० टक्क्यांवर आला असून कंपनीने बदलत्या काळानुसार सौर, पवन अशा अपारंपरिक वीजनिर्मितीवर भर देऊन राज्यातील आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा मिळवावे, असे आवाहन एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक मा. विश्वास पाठक यांनी मंगळवारी ओरोस येथे केले.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-कॅफे-कॉमेडी-आठ/
महावितरण, महानिर्मिती, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या सिंधुदूर्ग जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानिर्मितीचे संचालक अभय हरणे, महापारेषणचे संचालक संदीप कलंत्री, महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत, महापारेषणचे मुख्य अभियंता चिदप्पा कोळी आणि महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक एस. ए. पाटील उपस्थित होते.
मा. विश्वास पाठक म्हणाले की, महानिर्मिती ही सरकारी वीज कंपनी एकेकाळी राज्याच्या गरजेइतकी वीज निर्माण करून अतिरिक्त वीज अन्य राज्यांना विकत होती. पण आता महानिर्मितीचा राज्यातील वीजनिर्मितीमधील वाटा ४० टक्क्यांवर आला आहे. महानिर्मितीने बदलत्या काळानुसार सौर, पवन अशा अपारंपरिक वीजनिर्मिती वर भर देण्याची व त्याद्वारे वीजनिर्मितीमधील निर्विवाद वर्चस्व पुन्हा मिळविणे गरजेचे आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात समुद्र किनाऱ्याजवळ समुद्रातील वाऱ्याचा वापर करून पवन ऊर्जा निर्मिती करण्याच्या संधीचा महानिर्मितीने अभ्यास करावा.
ते म्हणाले की, आपण संपूर्ण राज्यभर जिल्हा आढावा बैठका घेत आहोत. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बैठक ३३ वी आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदूर्ग जिल्ह्यात वीजबिलांची वसुली आणि इतर बाबतीत महावितरणची कामगिरी चांगली आहे. या जिल्ह्यातील ग्राहक नियमितपणे वीजबिले भरत आहेत. त्यांची चांगल्या सेवेची अपेक्षा आहे. ग्राहकांच्या अपेक्षेनुसार सेवा देण्याचा प्रयत्न महावितरणने करावा.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वीज वितरण व्यवस्था बळकट करणारी आरडीएसएस योजना आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यामुळे राज्याच्या वीज क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल, असे मा. पाठक यांनी सांगितले.
मा. अभय हरणे म्हणाले की, चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड एनर्जी या राष्ट्रीय संस्थेने सिंधुदूर्ग जिल्ह्यात समुद्रात पवनचक्क्या उभारून वीजनिर्मितीची संधी असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्या दृष्टीने अभ्यास चालू आहे.
मा. संदिप कलंत्री म्हणाले की, सिंधुदुर्ग हा समुद्रकिनाऱ्याचा जिल्हा आहे. जिल्ह्याला गेल्या काही वर्षात दोन वादळांचा तडाखा बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधा या वादळात टिकणाऱ्या हव्यात.
मा. परेश भागवत, मा. चिदप्पा कोळी आणि मा. एस. ए. पाटील यांनी अनुक्रमे महावितरण, महापारेषण आणि महाऊर्जा यांच्या जिल्ह्यातील कामगिरीचे सादरीकरण केले.