Kokan: ‘आयुष्याच्या वळणवाटा ‘ कै. भालचंद्र घाडीगावकर यांच्या आत्मचरित्राचं दिमाखात प्रकाशन

0
10
आत्मचरित्र,प्रकाशन.
आयुष्याच्या वळणवाटा : कै. भालचंद्र घाडीगावकर यांच्या आत्मचरित्राचं दिमाखात प्रकाशन

भालचंद्र घाडीगावकर लिखित ‘आयुष्याच्या वळणवाटा’ या आत्मचरित्राचं प्रकाशन कार्यक्रमात डावीकडून सौ. प्रभात, अरूण घाडीगावकर, अभिनेते नारायण जाधव, अभिनेते-दिग्दर्शक-नाटककार, महाकादंबरीकार अशोक समेळ, प्रकाशक नितीन हिरवे, उदय घाडीगावकर आणि सूत्रसंचालक किरण वालावलकर दिसत आहेत.

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l निकेत पावसकर l सिंधुदुर्ग (तळेरे), दि. 18 –

‘भालचंद्र घाडीगावकर हे कर्मयोगी होते. त्यांनी निरपेक्षपणे कार्य केलं. फळाची, परिणामाची तमा त्यांनी कधी बाळगली नाही,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार, महाकादंबरीकार अशोक समेळ यांनी काढले. त्यांच्या, आणि ज्येष्ठ अभिनेते, कथा-कादंबरीकार नारायण जाधव यांच्या, शुभहस्ते देवगड तालुक्यातील दाभोळ येथील भालचंद्र घाडीगावकर लिखित ‘आयुष्याच्या वळणवाटा’ या आत्मचरित्राचं प्रकाशन ‘एम् सी एफ् जिमखाना’, बोरिवली येथे करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-विज्ञान-प्रदर्शन-समारंभ/

ते पुढे म्हणाले, ‘त्यांनी आयुष्यभर ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या गीतावचनाच्या मार्गावरून मार्गक्रमण केलं. आपल्या मुलांवरही त्यांनी उत्तम, चांगले संस्कार केले. आत्मचरित्र कुणी लिहावं, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. मला वाटतं प्रत्येकानं आत्मचरित्र लिहायला हवं. भालचंद्र घाडीगावकर यांनी आपल्या आयुष्यातील वळणवाटांचं अगदी प्रांजळपणे लेखन केलं आहे, ते प्रत्येकानं वाचलं पाहिजे’.

ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव यांनी कोकणी माणसांची काही वैशिष्ट्यं सांगत ‘आयुष्याच्या वळणवाटा’मधील एक कोकणी माणसांच्या करामतीचा प्रसंग आपल्या दमदार आवाजात पराणामकतेनं वाचून दाखवला. त्या वाचनानं या आत्मचरित्राविषयी वाचकांना उत्सुकता निर्माण झाली. तत्पूर्वी ‘संवेदना प्रकाशन’चे प्रकाशक नितीन हिरवे यांनी प्रास्ताविक करताना संवेदनाच्या प्रवासाबरोबरच हे आत्मचरित्र त्यांच्याकडे कसं आलं, ते त्यांनी कसं आणि का स्वीकारलं यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. ती श्रोत्यांच्या मनाला स्पर्शून गेली.

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ सूत्रसंचालन किरण वालावलकर यांनी आपल्या नेहमीच्याच खुसखुशीत शैलीत केलं. त्यांनी सादर केलेल्या ‘बाबां’वरील निवेदनास उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली. कवी दीपक कांबळींची बाबांवरील कविता वालावलकर यांनी सादर केली, ती प्रेक्षकांना प्रचंड भावली. सौ. प्रभात, अरूण आणि उदय या भालचंद्र घाडीगावकर यांच्या तिन्ही मुलांना किरण वालावलकर यांनी बोलतं केलं आणि त्यांच्याकडून आपल्या पित्याच्या विविध पैलूंविषयी, स्वभावाविषयी, व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेतलं. भालचंद्र घाडीगावकर यांचा नाती जपण्याचा, माणसं जोडण्याचा गुण सौ. प्रभातकडे आला, वाड्॰मयीन आणि रंगभूमी प्रेमाचा वारसा अरूणकडे तर सांगितिक वारसा उदयकडे संक्रमित झाला, असा निष्कर्ष सूत्रसंचालन वालावलकर यांनी मांडला. सूत्रसंचालनाची संहिता निमिषा वालावलकर यांनी उत्कृष्टपणे सिध्द केली होती.

या कार्यक्रमास अभिनेते अरूण होर्णेकर, शरीर सौष्ठवातील माजी राष्ट्रीय विजेते विकी गोरक्ष, कवी दीपक कांबळी, नाट्य व्यवस्थापक सदाशिव चव्हाण, अभिनेते दिगंबर राणे, दिग्दर्शक नंदू सावंत, आयडीबीआय बँकेतील माजी सहा. महा प्रबंधक उल्हास नारकर, जीवनविमा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी रवी सावंत, ‘घाडीगावकर सेवा समाजा’चे अध्यक्ष घनश्याम गावकर, पी ॲण्ड टी काॅलनीतील स्नेही आणि घाडीगावकर यांचे अनेक नातेवाईक आवर्जून उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here