Kokan: कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा- शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर

0
16
shivaki maharaj stacheu
कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा-शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर

कणकवली:-(आबा खवणेकर) नौदल दिनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत मालवण नजीकच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सोमवारी अखेर कोसळला. ही दुर्दैवी घटना आहे.या घटनेसाठी सरकार नौदलाकडे बोट दाखवत असले तरी त्यासाठी कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्यासह स्थानिक अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत.अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि भ्रष्टाचारी वृत्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचा घोर अपमान झाला आहे.त्यामुळे या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सार्वजनिक-बांधकाम-कार्य/

सिंधुदुर्ग ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी आहे. जिल्ह्यातील मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला उभारला आणि तो साडेतीनशे वर्षानंतर आजही मोठ्या दिमाखात समुद्राच्या लाटा झेलत उभा आहे. या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने नौदल दिवस मालवण येथे साजरा करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे निश्चित करण्यात आले. महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना सर्वच बाबतीत किमान काळजी घ्यायला हवी होती ती सार्वजनिक बांधकाम विभागाने मुळीच घेतलेली नाही. वास्तविक हे काम देशभरातील नामांकित कंपनीला निविदा काढून घेणे आवश्यक होते. मात्र बरीच कामे स्थानिक मजूर सोसायटी यांना विभागून देण्यात आली. मालवणचा वारा, खारी हवा, आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा पाया उभारण्याचा अनुभव आणि प्राविण्य या मजूर सोसायटीकडे आहे का, हा खरा प्रश्न आहे. या मजूर सोसायटी यांच्या नावावर भलत्याच कंत्राटदाराने काम केले.बोगस मजूर दाखवले आणि त्यांच्या नावावर खोटे काम करून छत्रपतींचा उपमर्द केला. “अनेक एजन्सी ठेकेदार एकच” असे हे काम आहे.या बेनामी ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे सर्वगौड यांच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणीही पारकर यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती ४३ फुटी पुतळा उभारताना तो कुठे उभारला जावा, तिथले हवामान काय आहे, आत कोणते रॉ मटेरियल वापरले जावे, पुतळ्याची उंची किती असावी, दिशा कोणती असावी, पाया कसा असावा, धातू कोणता वापरला जावा, या सगळ्या बाबींचा अभ्यास करूनच पुतळा उभारणे आवश्यक होते. मात्र तशी कोणतीही खबरदारी संबंधित यंत्रणांनी घेतलेली नाही. आज सर्वजनिक बांधकाम विभाग नौदलाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकून टाकू पाहत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला ती जबाबदारी झटकता येणार नाही. या विभागाचे स्थानिक अधिकारी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची दिशाभूल करीत आहेत. त्यांना अंधारात ठेवून अंदाधुंद कारभार करण्यात येत आहे. त्याचाच फटका साक्षात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लौकिकालाही बसला आहे.

शिव पुतळ्याच्या पायाचे नट गंजल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाला दिल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र हा देखील जबाबदारी झटकून टाकण्याचा एक प्रकार आहे. संपूर्ण पुतळाच धोक्यात आलेला असताना फक्त एक स्क्रू खराब झाल्याची माहिती का देण्यात आली ? पुतळ्याची देखभाल कोण करीत होते? येथील स्थानिकांच्या सूचनांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले? याची चौकशी करावी. संबंधित अधिकाऱ्यांच्या एकूणच कामाची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी पारकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here