महाराष्ट्राचे वैभव टिकवा, मुख्याधिकारी कंकाळ यांचे आवाहन
वेंगुर्ला प्रतिनिधी- सध्याच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांना भेटी देवून त्यांचा इतिहास जाणून घेऊन त्यांना संरक्षित व संवर्धित केले पाहिजे. त्यांच्या एकत्रित कृतीतून हे साध्य झाल्यास महाराष्ट्राचे हे वैभव टिकून राहील असे मत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी किल्ले बांधणी स्पर्धेच्या परिक्षणादरम्यान व्यक्त केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा ४.० च्या अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेने दिवाळी सणाचे औचित्य साधून घेतलेल्या किल्ला बांधणी स्पर्धेत भटवाडी येथील बाल गणेश मित्रमंडळाने बनविलेल्या सज्जनगड किल्ल्याच्या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकाविला.https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-भारतीय-उगवता-स्/
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजण्यासाठी व मोबाईल ऐवजी दगड, माती व चिखल यामध्ये समरूप होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. यात शहरातील सहा मंडळांनी सहभाग घेतला. प्रथम पारितोषिक विजेत्या बाल गणेश मंडळामधील इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतच्या मुलांनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरण पाहून मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी त्यांचे कौतुक केले. सज्जनगड किल्ल्यामध्ये मुलांनी स्वच्छता संदेश व सामाजिक विषयक जनजागृती करणारी भित्तीचित्रे समाविष्ट केली होती. तर प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून कचराकुंडी व टायरपासून फुलांची कुंडी बनविले होते. स्पर्धेत भटवाडीच्या सप्तरंग मित्रमंडळाच्या ‘राजगड‘ प्रतिकृतीला द्वितीय तर राऊळवाडा येथील शिवतेज बालमित्रमंडळाच्या ‘पन्हाळा‘ प्रतिकृतीला तृतीय क्रमांक देण्यात आला. स्पर्धेचे परिक्षण जे.जे.आर्ट स्कूलचे निवृत्त प्राचार्य व वेंगुर्ला नगरपरिषदेचे स्वच्छता ब्रॅण्ड अँबेसिडर सुनिल नांदोस्कर व मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले.
फोटोओळी – किल्ले बांधणी स्पर्धेत भटवाडी येथील बाल गणेश मित्रमंडळाने बनविलेल्या सज्जनगड किल्ल्याच्या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकाविला.