🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l दापोली –
दापोली- दापोली तालुक्यातील गिम्हवणे केंद्रस्तरीय हिवाळी शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून चंद्रनगर परिसरातून या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. दापोली तालुक्यातील गिम्हवणे केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच मौजे दापोली येथील श्री जानाई देवी क्रीडा नगरीत फार मोठ्या उत्साहात पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत गिम्हवणे केंद्रातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर या शाळेने सर्वच क्रीडा प्रकारांत नेत्रदीपक कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सामाजिक-कार्यकर्ते-बाळा/
लंगडी लहान व मोठ्या गटात विजेतेपद, खो- खो मुलगे लहान व मोठ्या गटात विजेतेपद, कबड्डी मुलगे लहान गटात विजेतेपद तर मोठ्या गटात उपविजेतेपद, खो-खो मुली मोठ्या गटात उपविजेतेपद, शंभर मीटर धावणे मोठ्या गटात अथर्व सुनील रांगले याने प्रथम क्रमांक, लांब उडी मोठ्या गटात दीप शिगवण याने द्वितीय क्रमांक, उंच उडी मोठ्या गटात अथर्व रांगले याने द्वितीय क्रमांक, लांब उडी लहान गटात प्रतीक पागडे याने प्रथम क्रमांक, उंच उडी मोठ्या गटात आरोही मुलूख हिने द्वितीय क्रमांक, १०० मी. धावणे मोठ्या गटात सौम्या बैकर हिने द्वितीय क्रमांक, उंच उडी लहान गटात प्रतीक पागडे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक मनोज वेदक, मानसी सावंत, बाबू घाडीगांवकर, रेखा ढमके यांचे मोलाचे व सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे.
सर्वच क्रीडा प्रकारांत अशा प्रकारचे घवघवीत यश संपादन करणाऱ्या चंद्रनगर शाळेच्या विद्यार्थ्यांचे चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, उपसरपंच राजेंद्र मिसाळ, चंद्रनगर ग्रामस्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीधर जाधव, उपाध्यक्ष सुनील रांगले, रत्नागिरी जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य मोहन मुळे, मुख्याध्यापक मनोज वेदक, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले आदी अनेकांनी विशेष कौतुक केले आहे.