Kokan: कोकणचे दुःख कोणी दूर करेल? कोकणात माकडांचा उच्छाद – अविनाश काळे यांचा उपोषणाचा इशारा.

0
51
कोकणात माकडांचा उच्छाद
कोकणात माकडांचा उच्छाद

कोकण– कोकणात माकड आणि वानर हे दोन प्राणी नसले तर कोकण समृद्ध होईल. गेली कित्येक वर्षे न मारल्यामुळे कांहि वर्षात यांची संख्या शंभरपटीने वाढली आहे. ग्रामीण भागात नागरिक कष्ट करून स्वर्ग निर्माण करतील. आज लाखो रुपयांचे कष्ट पाण्यात जात आहेत. हे दुःख कोणाला समजेल काय? आंबा राखणीसाठी आज लाखो रुपये खर्च होत आहेत. केळी, भाजीपाला, नारळ, फळभाज्या, फणस, चिकू, पेरू, पपई, शेवगा, कुळीथ, उडीद, इत्यादिंचे लाखो रुपयांचे उत्पन्न ही जोडी आणि त्यांची प्रचंड वाढलेली जमात फस्त करतेय. शिवाय नळे, कौले, छप्पराचे पत्रे फोडणे यांचे नुकसान वेगळे. माकडे तर घरात घुसून नासधूस करायला लागली आहेत. अंगावर येण्याचे धैर्य त्यांच्याकडे वाढत चालले आहे. आर्थिक नुकसान, हाकलण्याचे शारीरिक नुकसान, होणाऱ्या वेदना, हतबलता आणि मानसिक नुकसान… किती सोसायचे? मागे मी पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत मांडले होते, त्यावेळी वनाधिकारी माझ्याकडे येऊन नुकसान भरपाई बाबतचा जीआर (Government Resolutions) देऊन गेले. त्यात प्रचंड त्रुटी आहेत. हे त्यांनाही माहीत आहे. पंचनामा, त्यावरील सह्या, खाल्लेले नुकसान कसे दाखवणार? राखण करण्यासाठी होणारा त्रास, नळे,पत्रे फोडलेले इ. बाबत भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती आहे . https://sindhudurgsamachar.in/kokan-भारतरत्न-महर्षी-कर्वेंच/

आज आम्ही कोकण सोडून इतर ठिकाणच्या भाजीपाला, शेवगा, चिकू, पेरू, केळी यांच्या बहरलेल्या बागा पाहतो. आम्ही आंबा, पपई, शेवगा, चिकू, पेरू, केळी, भाजीपाला इ. चे प्रचंड उत्पादन घेऊ शकतो पण आम्ही हतबल आणि असहाय आहोत. खरं तर कुणी वालीच नाही असं झालंय. हिमाचल प्रदेश मध्ये वानर आणि माकडे यांना उपद्रवी पशु जाहीर करून मारायला सुरुवात केलीय शिवाय मारण्यासाठी अनुदान देणे सुरू केले असे वाचनात आलेय. महाराष्ट्रातसुद्धा असं करण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात कोकणातील शेतकरी आत्महत्या करूं लागला तर आश्चर्य वाटायला नको. आज कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत कारण इथे एक पीक पद्धती ऐवजी बहुपिक पद्धत आहे. दोन माड, दोन फणस, थोडी शेती, दोन कलमे, चार जांबी इत्यादि प्रत्येक घरात असल्याने त्याला कांहीतरी मिळतं. मात्र आज वानर, माकडांनी त्यावर घाला घातला आहे. कोकणातील ग्रामीण भागातील ही परिस्थिती कोणी लक्षात घेईल काय? शहरात बसून सल्ले देणे खूप सोपे आहे. एकदा कोकणांत राहून अनुभवा……

या परिस्थितीतून कोकणी माणसाला दिलासा मिळेल काय? माणूस जगला पाहिजे की प्राणी जगला पाहिजे हे सुद्धां एकदा ठरवण्याची गरज आहे. सरकार उपद्रवी पशु म्हणून वानर, माकडे यांना जाहीर करेल काय? नाहीतर रीतसर पत्र देऊन महिनाभरात आता उपोषणाला बसणार आहे.

मित्रांनो, प्रत्येक कोकणस्थाला भेडसवणारा व मनस्ताप देणाऱ्या या प्रश्नाला अविनाश काळे हे वाचा फोडत आहेत. त्यांच्या या कोकण शेतकरी हिताच्या वानर हटाव मोहीमेला यश त्यांना पाटबळ देण्यासाठी या क्रमांकावर ९४२२३७२२१२ संर्पक साधू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here