रत्नागिरी- चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या ‘रत्नागिरी आठ’ (सुवर्णा-मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांनाही लागली आहे. या वाणाला असलेल्या वाढत्या मागणीमुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने गतवर्षीच्या ६० टन बियाणापेक्षा दुप्पट बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी १५० टन बियाणे विद्यापीठाने वितरणासाठी तयार केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-वालावल-लक्ष्मी-नारायण-मं/
शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राने २०१९ साली ‘रत्नागिरी आठ’ हे वाण विकसित केले. देशातील काही खासगी कंपन्या विद्यापीठाच्या मान्यतेने बियाणे तयार करून विक्री करत आहेत.
कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये या वाणाने लोकप्रियता मिळवली आहे, तसेच गेल्या चार वर्षांत या वाणाला उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांतूनही पसंती मिळाली आहे.