Kokan: गणपतीपुळे ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामसेवकाच्या मनमानीची हद्द ; पर्यटकांचे जीव वाचवणाऱ्या सुपरहिरोवर उपोषणाची वेळ

0
21
गणपतीपुळे ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामसेवकाच्या मनमानीची हद्द ; पर्यटकांचे जीव वाचवणाऱ्या सुपरहिरोवर उपोषणाची वेळ

व्यवसाय परवानगी, राजकीय दबाव ते आत्महत्या करण्याचा इशारा तरीही जिल्हा प्रशासन सुस्त

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l रत्नागिरी l विशेष प्रतिनिधी

तालुक्यातील गणपतीपुळे येथिल नारळ पाणी विक्रेते शरद मयेकर त्यांच्या पत्नीसह शुक्रवारी, २७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. समुद्र किनारी पती पत्नीच्या नारळ पाणी, भेळपुरी विक्रीच्या व्यवसायाला ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक हे व्यवसाय करण्यास मनाई करत असल्यामुळे मयेकर दाम्पत्यांने उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. उपोषणाला बसण्यापूर्वी प्रशासनाला दिलेल्या पत्रकाद्वारे त्यांनी गणपतीपुळे ग्रामपंचायतचा मनमानी कारभार कशा पद्धतीने सुरू आहे हे देखील समोर आणले आहे. तरीही जिल्हा प्रशासन सुस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शरद अशोक मयेकर मी राहणार मालगुंड भंडारवाडा (ता.जिल्हा- रत्नागिरी )येथील नागरिक असून सुमारे वीस वर्षापासून गणपतीपुळे समुद्र किनारी नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करीत आहे. या व्यवसायावर कुटुंब चालवीत आहे. वीस वर्षापासून सुरू असलेल्या समुद्र किनारी नारळ पाण्याचा विक्रीचां व्यवसाय तसेच भेलपुरीचा व्यवसाय करण्यास गणपतीपुळे ग्रामपंचायतने मनाई केल्याने माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंचायतने कोणत्या आधारे व्यवसाय नाकारला याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच, सुमारे 20 वर्षापासून गणपतीपुळे समुद्र किनारी नारळ विक्रीचा व्यवसाय आहे. मी वेळोवेळी ग्रामपंचायतला कर देखील भरत होतो. दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी माझी पत्नी सौ. आदिती ही व्यवसाय चालवण्याची परवानगी मागण्याकरिता गेली असता सरपंच व ग्रामसेवक यांनी तिला उडवा-उडवीची उत्तरे दिली व तुला आम्ही उत्तर देणार नसल्याचे सांगितले. असेही पत्रकात नमूद केले आहे.

गणपतीपुळे ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक हे वेळोवेळी आपल्या अधिकारी पदाचा गैरवापर करून आमच्यावर अन्याय करत आहे. तसेच ग्रामपंचायत सरपंच या महिला सरपंच असून स्वतःच्या पदाचा गैरवापर करून आमची आर्थिक पिळवणूक करत आहे. आम्ही याबद्दल विचारना करण्यासाठी ग्रामपंचायत गेलो असता आम्हाला हिन दर्जाची वागणूक मिळते. “तुम्हाला काय करायचे ते करा” असे सांगून राजकीय दबाव आणला जातो अन् ग्रामपंचायतमधून हाकलून दिले जाते, धक्कादायक प्रकार मयेकर यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रकात नमूद केला आहे.

ग्रामसेवक, सरपंच तत्काळ कारवाईसह बदलीची मागणी

गणपतीपुळे ग्रामपंचायत यांच्याकडून आम्हाला होणाऱ्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल ग्रामसेवक गणपतीपुळे व सरपंच हे पैशाची मागणी करत असल्यामुळे आता जगणे मुश्किल झाले आहे. तरी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ कारवाई होऊन ग्रामसेवक गणपतीपुळे यांची बदली व्हावी. अशी थेट मागणी प्रशासनाकडे लेखी पत्रकातून करण्यात आली आहे. यासोबत, गणपतीपुळे ग्रामपंचायत यांच्यावर यापूर्वी मालगुंड येथील रहिवासी प्रनेश मयेकर यांनी न्यायालयात केस दाखल केलेली आहे. ग्रामपंचायत गणपतीपुळे सरपंच कल्पना पकले, ग्रामसेवक चौधरी हे आपल्या पदाचा गैरवापर करून आम्हा नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास देत आहेत. ग्रामपंचायत ग्रामसेवक गेली कित्येक वर्षे इथे आहे.यांच्यावर कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल ही पत्रकातून उपस्थित केला आहे.

योग्य न्याय मिळाला नाही तर मला माझ्या कुटुंबासह

सरपंच ग्रामसेवक गणपतीपुळे हे हुकूमशाही गाजवत आहेत. सरपंच ग्रामसेवक चौधरी हे दोघे गावातील ग्रामस्थांना जाणीवपूर्वक त्रास देता. राजकीय वरदस्त असल्याने कोणी आवाज उठवून तक्रार देत नाही आम्ही ग्रामपंचायत येथे गेलो असता सरपंच ग्रामसेवक गणपतीपुळे आम्हालाही त्याची वागणूक ग्रामपंचायत कार्यालयातून हाकलून देतात व “तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा आमचे वाकडे करू शकणार नाही” असे सांगतात. तर यावर आपण योग्य ती कारवाई करावी, योग्य न्याय मिळाला नाही तर मला माझ्या कुटुंबासह आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही असा थेट इशारा उपोषणापूर्वीच उपोषणकर्ते शरद मयेकर यांनी लेखी पत्रकाद्वारे प्रशासनाला दिला आहे.

उपोषणकर्ते शरद मयेकरांनी अनेकांचे वाचवलेय प्राण

शरद मयेकर यांनी नारळ पाणीचा व्यवसाय करत असताना गणपतीपुळे येथे येणारे भाविक समुद्रात पोहण्यासाठी जात असतात. मात्र पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने बुडण्याचे प्रसंग यापूर्वी अनेक वेळेस घडले आहेत. परंतु उपोषणकर्ते मयेकर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता एक जागरूक नागरिक या नात्याने अनेकांचे प्राण वाचविले आहे. आजपर्यंत त्यांनी सुमारे 39 पर्यटकांचे प्राण वाचविले आहेत. या कौतुकास्पद कामगिरीचे जिल्हा दंडाधिकारी साहेब रत्नागिरी व जिल्हा पोलीस प्रशासन रत्नागिरी यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरविण्यात आले आहे. मात्र मयेकर यांच्यावर आज व्यवसायासंबधित उपोषणाची वेळ आली आहे. हे दुर्दैव म्हणावे लागेल. या प्रकरणाची गंभीर दखल घेणे दूरच मात्र त्यांचा अशा उपोषणामधून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी छळ सुरू केला आहे का? जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here