दापोली- डिसेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक मृदादिन म्हणून जगभरात साजरा होतो. दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वतीने दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथे या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या मृदाशास्र व कृषी रसायनशास्त्र विभागांतर्गत ‘ रावे ‘ च्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चंद्रनगर येथील श्री देवी घाणेरीन मंदिराच्या प्रांगणात ‘ जागतिक मृदादिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात चंद्रनगर परिसरातील शेतकरी बांधवांसाठी मृदा परिक्षण, प्रात्यक्षिक, मृदा संवर्धन व जतन, विज्ञान प्रदर्शन, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, र. जि.प. नियोजन समितीचे सदस्य मोहन मुळे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-बांदा-केंद्रशाळेच्या-चा/
या सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती व उपक्रमांची निर्मिती व मांडणी केली होती. शेतीविषयक, विज्ञानविषयक संवेदनशील विषय व मृदासंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या प्रतिकृतींची निर्मिती केल्याबद्दल डाॅ. संजय भावे यांनी चंद्रनगर शाळेतील वेदिका मुलूख, पुर्वा जगदाळे, वैष्णवी आंबेलकर, दिया मुलूख, शमिका मुलूख, वेदांत शिगवण, आयुष मिसाळ, इशांत पागडे, अथर्व रांगले, दीप शिगवण, विराज मुलूख, प्रसाद शिगवण, सोहम मुलूख, श्रेयस मुळे, श्रावणी कोळंबे, मंजिरी पवार, सौम्या बैकर, नीरजा वेदक, आरोही मुलूख, सांची मिसाळ, मनस्वी आंबेलकर या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांना छोटी भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन त्यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींचे महत्त्व ओळखून परिसरातील सर्व शेतकरी मृदा संवर्धन करून नव्या सुधारणांचे स्वागत करतील अशी आशा डाॅ. संजय भावे यांनी व्यक्त केली. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतील बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत, मनोज वेदक, अर्चना सावंत या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या प्रतिकृती व उपकरणांची निर्मिती केली होती. या सुंदर निर्मितीबद्दल चंद्रनगर परिसरातून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.