दोडामार्ग / प्रतिनिधी : दोडामार्ग बाजारपेठेत होळी दिवशी झालेल्या दागिने चोरी प्रकरणातील चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. रामेश्वर केशव म्हाळसेकर (रा. पर्ये, साखळी, गोवा) याला होंडा येथून मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. आयी येथे टाकलेली चोरीतील टुरिस्ट बॅगही जप्त करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-गुड-फ्रायडे-ख्र/
याप्रकरणी सोन्याची तीन ग्रॅमची कर्णफुले व १५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल संशयीताकडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार २४ मार्च रोजी मांगेली येथील रसिका गवस या पुण्याहून होळी सणासाठी गावी आल्या होत्या. बाजारपेठेत खरेदीसाठी जाताना त्यांनी आपली टुरिस्ट बॅग त्यांचे दीर सचिन गवस यांच्या मोटरसायकलवर ठेवली होती. खरेदी करून परतल्यानंतर सदर बॅग चोरीस गेल्याचे स्पष्टझाले होते. त्या बॅगमध्ये सोन्याचे दागिने, कॅमेरा, स्मार्ट वॉच असा एकूण २ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता.
दोडामार्ग महिला पोलीस हवालदार डिसोझा यांना गोपनीय सूत्रांकडून चोरी प्रकरणातील संशयित होंडा गोवा येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह पोलीस शिपाई विजय जाधव व अन्य दोन कर्मचाऱ्यांनी होंडा येथून चोरट्याला ताब्यात घेतले. दोडामार्ग पोलिसांनी पाच दिवसातच चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळविले.