दापोली- जिल्हा परिषद रत्नागिरी आणि पंचायत समिती दापोली आयोजित दापोली तालुकास्तरीय हिवाळी क्रीडास्पर्धा नुकत्याच दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मैदानावर पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत मुलांच्या क्रिकेट क्रीडाप्रकारात दापोली प्रभागाने विजेतेपद पटकावले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कै-सुधीर-कलिंगण-यांच्या/
नाॅक आऊट पद्धतीने खेळल्या गेलेल्या क्रिकेट स्पर्धेत एकूण सहा प्रभागांच्या क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता. उपांत्य फेरीपर्यंतचे सामने तीन षटकांचे तर अंतिम सामना चार षटकांचा खेळविण्यात आला. गावतळे व दापोली या दोन प्रभागांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात गावतळे प्रभागाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. प्रथम फलंदाजी करताना दापोली प्रभागाच्या फलंदाजांनी निर्धारित चार षटकांत सहा गडी गमावून फक्त १४ धावा केल्या. मात्र प्रत्युत्तरादाखल खेळताना गावतळे संघाचे फलंदाज सहा गडी गमावून फक्त ११धावा करु शकले.
संपूर्ण स्पर्धेत दापोली प्रभागाच्या क्रिकेट संघातील आदेश शिर्के, पार्थ मळेकर, वेदांत शिगवण, अथर्व रांगले, मिहीर पावसे, संचित पाटील, कुणाल बुरटे, क्षितिज भुवड, विनम्र रांगले या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. दापोली प्रभागाच्या संघास उजेर शेख, बाबू घाडीगांवकर यांचे मार्गदर्शन लाभले. दापोली तालुकास्तरावर क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करून विजेतेपद पटकावल्याबद्दल दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, केंद्रप्रमुख सुनील कारखेले, गुलाबराव गावीत आदी अनेकांनी अभिनंदन केले आहे.