वेंगुर्ला प्रतिनिधी- नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेतर्फे तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
यात लक्ष्मी नारायण शेणई वक्तृत्व स्पर्धा – शहर परिसरातील शाळांतील पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी ‘वेंगुर्ला स्वच्छता अभियान‘ यावर ७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. यातील प्रथम तीन विजेत्यांना १००, ७५ व ५० अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.https://sindhudurgsamachar.in/kokan-तुळस-येथे-शाळांसाठी-विवि/
पं.जनार्दन शास्त्री कशाळीकर स्मृती पाठांतर स्पर्धा-७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता घेण्यात येईल. यात पाचवी ते सातवी गटासाठी हरिपाठाचे १ ते १५ अभंग पठण तर आठवी ते दहावी गटासाठी ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा १ ते १५ ओव्या पठण करावयाच्या आहेत. दोन्ही गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ३००, २५०, २०० अशी बक्षिस ठेवण्यात आली आहेत. भालचंद्र शंकरराव कर्पे स्मरणार्थ स्मृती सुगम संगीत स्पर्धा – तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाचवी ते सातवीतील गटासाठी संतांचे अभंग व आठवी ते दहावी गटासाठी नाट्यगीत गायन स्पर्धा रविवार ८ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता घेण्यात येईल. प्रत्येक गटातील विजेत्या प्रथम ५ क्रमांकांना अनुक्रमे रु.२५०, २००, १५० आणि १००ची दोन अशी रोख रक्कमेची पारितोषिक देण्यात येणार आहेत.
सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत वक्तृत्व स्पर्धा-आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. ‘स्वामी विवेकानंद माझे श्रद्धास्थान‘ यावर स्पर्धकांनी १० मिनिटे तर आठवी ते बारावीतील फक्त विद्यार्थीनींकरीता ‘स्वा.सावरकर देशाचे अनमोल रत्न‘ यावर १० मिनिटे बोलावयाचे आहे. वरील दोन्ही स्पर्धा शनिवार दि.८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता नगरवाचनालय संस्थेच्या सभागृहात होणार आहेत. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम ५ विजेत्यांना ५००, ३००, २५०, १५० व १०० याप्रमाणे विनायक पार्सेकर व जयवंती विनायक पार्सेकर स्मरणार्थ पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील विद्यालयांनी प्रत्येक गटातील २ स्पर्धकांची नावे ४ जानेवारीपर्यंत पाठवावीत असे आवाहन नगर वाचनालय संस्थेचे कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.