संचालक (प्रकल्प) मा.श्री.प्रसाद रेशमे यांचे प्रतिपादन
रत्नागिरीत महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेस थाटात प्रारंभ
रत्नागिरी : महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी, कला जोपासण्याची संधी मिळावी. त्यात कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून पुन्हा ग्राहकसेवेसाठी जोमाने कामाला लागावे, यासाठी दरवर्षी क्रीडा व नाट्यस्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन संचालक (प्रकल्प) मा.श्री.प्रसाद रेशमे यांनी केले. रत्नागिरीत महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेस थाटात प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.https://sindhudurgsamachar.in/maharshtra-भागुबाई-खिचडिया-१६-वर/
रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात आयोजित महावितरणच्या कल्याण प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन संचालक (प्रकल्प) मा.श्री.प्रसाद रेशमे व जिल्हाधिकारी मा.श्री. एम.देवेंदर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता मा.श्री.परेश भागवत, मुख्य अभियंता मा.श्रीमती सुचित्रा गुजर, मुख्य अभियंता मा.श्री. धनंजय औढेंकर (कल्याण परिमंडल), मुख्य अभियंता मा.श्री. सुनिल काकडे (भांडुप परिमंडल), अधीक्षक अभियंता मा.श्री. स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता मा.श्री. विनोद पाटील यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मा.श्री.रेशमे यांनी, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वीज कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल सर्वांचे कौतुक केले. ग्राहकांना सेवा देणे व सेवेचे मोल वेळेत वसूल करणे, ही आपली जबाबदारी आहे. वसुली व खर्च यातील ताळमेळ बसविण्यासाठी वीज बिल वसुलीशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी मा.श्री. एम देवेंदर सिंह यांनी वीज सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल, सतर्कता व समन्वय राखत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जगबुडी नदीला पुर आल्याने २४ गावांचा वीज पुरवठा बाधित झाला. त्यावेळी ‘सीएपीएफ’च्या जवानांच्या मदतीने वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी सर्वांनी ७ मे रोजी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले.
दैनंदिन कामातून विरंगुळा व्हावा.कर्मचाऱ्यांच्या कलेच्या अंगाला पैलू पडावेत. रसिकांना व कलाकारांना आनंद मिळावा, या हेतूने हा नाट्यस्पर्धेचा मंच निर्माण करण्यात आल्याचे संयोजक तथा मुख्य अभियंता मा.श्री.परेश भागवत यांनी सांगितले. या नाट्यस्पर्धेत सहा संघ असल्याने चुरस आहे. स्पर्धेत सहभाग नोंदविणे हा एक विजय असल्याचे ते म्हणाले. मान्यवरांनी समयोचित मनोगते व्यक्त केली. सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा.श्री. अप्पासाहेब पाटील यांनी केले.
प्रारंभ सत्रात हे भांडुप परिमंडलाने ‘द रेन इन द डार्क’ या नाटकातून मानसिक आजार, त्यातून बिघडत जाणारे नातेसंबंध व त्यावरील उपाय हा क्लिष्ट विषय सोप्या पद्धतीने उलगडण्याचा केलेला प्रयत्न रसिकांना भावला. उत्कृष्ट अभिनयासह, प्रकाश व ध्वनीयोजना या तांत्रिक बाबी उत्तमपणे सांभाळल्या.
त्यानंतरच्या सत्रात कल्याण परिमंडलाने ‘ऑक्सिजन’ हे नाटक सादर केले.
उद्या सकाळी ११.०० वाजता रत्नागिरी परिमंडलाचे ‘डबल गेम’ व तर दुपारी ३.३० वाजता ‘द ग्रेट एक्सचेंज’ हे नाशिक परिमंडलाचे नाटक सादर होईल. दि.२६ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता ‘एकेक पान गळावया’ हे प्रकाशगड, मुंबई मुख्य कार्यालयाचे तर दुपारी २.३० वाजता ‘म्याडम’ हे जळगाव परिमंडलाचे नाटक सादर होईल. नाट्यरसिकांना विनामूल्य प्रवेश उपलब्ध आहे. तरी नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.