🔷पावसाळ्यात हिवाळ्याप्रमाणे धुक्याची दाट चादर
कणकवली (प्रतिनिधी) : गेले सुमारे दोन आठवडे पावसाने ओढ दिल्याने कोकणातील भातशेतीसह भरड धान्यांची शेती अडचणीत आली आहे. भल्या पहाटेपासूनच भर पावसाळ्यात हिवाळ्याप्रमाणे धुक्याची दाट चादर आसमंतात पहुडलेली दिसत आहे. कडक उन्हामुळे भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. विम्याचे कवच असले तरी कष्टाने केलेली लागवड फुकट जाण्याची भिती वाटत असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे, असे निरीक्षण कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नोंदविले आहे .https://sindhudurgsamachar.in/maharashtra-कांद्याला-4-हजार-रुपयांच/
गेले १५ दिवसांत कोकणात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडत आहे. गेले ४-५ दिवस तर पावसाने चक्क पाठ फिरवली आहे. गेले दोन-तीन दिवस तर भल्या पहाटे ऐन पावसाळ्यात हिवाळ्याप्रमाणे धुक्याची दाट चादर पहुडलेली दिसत आहे, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणाले, शेतकर्यांच्या अनुभवानुसार भातशेतीला मुबलक पाणी मिळत नसल्याने कडक उन आणि धुक्यामुळे भातशेतीवर करपा रोगाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचे आगमन न झाल्यास शेती हातची जाण्याची भिती शेतकर्यांना वाटू लागली आहे.
यंदा मुळात पावसाळा उशिरा सुरू झाला. त्यामुळे शेतीची कामे लांबली. तरी बहुसंख्य कष्टकरी शेतकरी वर्ग वर्षभर घरचे पिकविलेले अन्न खायला मिळावे म्हणून पोटाला चिमटे काढून शेती करतो. मात्र सद्य परिस्थितीत शेती अडचणीत आली आहे, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणाले, यंदा राज्य शासनाच्या वीमा योजनेनुसार शेतकर्यांनी १ रुपयात शेती पिक वीमा काढला आहे. मात्र पर्यावरणाच्या र्हासामुळे डोळ्यांदेखत शेती वाया गेल्यास शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत.