नागरिकांना महावितरणचे आवाहन
कोकण परिमंडळ – पावसाळ्याच्या दिवसात विजेमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढते, ही चिंतेची बाब आहे. विजेपासूनचा हा धोका टाळता येणे शक्य आहे. पावसाळ्याच्या दिवसात वीजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे महावितरणचे आवाहन आहे. पावसाळ्याचे दिवसात विद्युत यंत्रणेतील तारा तुटणे, वीजखांब वाकणे वा पडणे, रोहित्र (डिपी स्ट्रक्चर) वाकणे वा कोसळून पडणे, वीजतारांवर झाड वा झाडांची फांदी तुटून पडणे अशा घटना घडतात. त्याबाबत नागरिकांनी तत्काळ महावितरणच्या नजिकच्या कार्यालयास कळवावे. तुटलेल्या विजेच्या तारा, विजेचे खांब, स्टे वायर, ट्रान्सफॉर्मर आदींसह विद्युत यंत्रणेतील कोणत्याही उपकरणांना नागरिकांनी स्पर्श करणे टाळावे, ते धोकादायक व जीवघेणे ठरू शकते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-प्री-बजेट-एक्सपेक्टेशन/
पाऊस चालू असतांना ओल्या हातांनी शेतीपंप चालू अथवा बंद करणे शक्यतो टाळावे. शेतशिवारात वावरताना हातमोजे व गमबूट वापरावेत. ट्रान्सफॉर्मर, वीजखांब व विजेच्या तारांखाली थांबणे टाळावे. विजेच्या वाहिन्या गेलेल्या परिसरात वावरताना सुरक्षेच्या कारणास्तव सजग रहावे. शेतात कामासाठी,जनावरांना चारा आणायला जाताना काळजी घ्यावी. जनावरे, गुरे-ढोरे वीजखांबास, स्टे वायर्सना तसेच विजेच्या तारांखाली असलेल्या झाडांना बांधू नये. शेतीपंपाला वीज पुरवठा करणारी व अर्थिगची वायर अखंड असावी. एखाद्या व्यक्तीस विजेचा धक्का बसल्यास, त्या व्यक्तीस स्पर्श न करता कोरड्या लाकडाने बाजूला करावे. त्वरित कृत्रिम श्वासोच्छ्श्वास देत रुग्णालयात घेऊन यावे.
वीज अपघाताची प्रमुख कारणे- ओल्या हाताने पाण्याचे विद्युत मोटारीला/पंपाला स्पर्श होणे. कडबाकुट्टीत वीज प्रवाह उतरणे. कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या धातूच्या तारेत वीजप्रवाह उतरणे. ठिकठिकाणी जोड देण्यात आलेल्या वा आवरण खराब झालेल्या विजेच्या वायरीतून लोखंडी खिडकी, दरवाजा, ग्रिल मध्ये वीज प्रवाह उतरणे. फ्रिज, कुलर, मिक्सर इस्त्री, गिझर इ. विद्युत उपकरणांत वीजप्रवाह उतरणे. विद्युत खांब वा स्टे वायरमधून उतरलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसणे. शेतात ओल्या हाताने शेतीपंप चालु करताना विजेचा धक्का बसणे. तुटलेल्या वीजतारेच्या अनावधानाने संपर्कात येणे. वाहनाच्या टपावर वा मालवाहू ट्रक वा ट्रॅक्टरवर बसल्याने विजेच्या तारांना स्पर्श होणे, ही अपघाताची वारंवार दिसून येणारी कारणे आहेत. तरी नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी.
वीज अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी खालील बाबींची दक्षता घ्यावी-
उपकरणांचा पाण्याशी संपर्क टाळा – पाणी हे वीजसुवाहक आहे. घर, दुकान वा इमारतीमधील विजेचे स्विच बोर्ड, उपकरणे पावसाच्या पाण्याशी किंवा ओलाव्यासी संपर्कात येणार नाहीत. याची विशेष काळजी घ्यावी. वीज मिटरच्या जागी पाणी झिरपुन जागा ओलो होत असल्यास, मिटर जवळचा मेनस्विच बंद करुन महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. ओलाव्याच्या ठिकाणी विद्युत उपकरणे हाताळतांना पायात रबरी चप्पल किंवा बुट घालावा. कपडे वाळण्यासाठीची दोरी वीजखांबास वा विद्युत प्रवाहित होईल अशा ठिकाणी बांधू नये. कापडी वा विद्युत रोधक दोरीचा वापर करावा. आर्थिग व वीज मांडणी तपासणी,दुरूस्ती – विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अर्थिग फार महत्वाची आहे. परवानाधारक व्यक्तिकडून अर्थिग व वायरींग सुस्थितीत असल्याची खात्री करुन घ्यावी. अर्थिग व वायरींगमध्ये दोष आढळल्यास तात्काळ तो दोष परवानाधारक व्यक्तिकडून दुरूस्त केला पाहीजे. घर, दुकान, इमारतीत वीजसंच मांडणीत अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (इएलसीबी), रेसीड्यूअल करंट सर्कीट ब्रेकर (आरसीसीबी), मिनीअॅच्युर सर्कीट ब्रेकर (एमसीबी) या सुरक्षा साधनांचा वापर विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे संभाव्य वित्त व जीवितहानी टाळता येते. घरातील जुन्या वायरिंगची तपासणी करणे, खराब झालेली तसेच आवरणाची रोधक क्षमता कमी झालेली वायरींग तात्काळ बदलण्यात यावी. दर्जेदार उपकरणांचा वापर करा- फ्रिज, कुलर, मिक्सर इस्त्री, गिझर, मोटार इत्यादी उपकरणांकरीता थ्री फेज पीन आणि सॉकेटचाच वापर करावा. आय. एस. आय. चिन्ह आणि योग्य दर्जा असलेली विद्युत उपकरणे वापरणे आवश्यक आहे. बांधकाम करताना काळजी घ्या- लघुदाब, उच्चदाब किंवा अति उच्चदाब वाहीनी खाली कोणत्याही इमारतीचे किंवा इतर बांधकाम करु नये. तसेच इमारत बांधकाम व वाहिन्यांमध्ये नियमानुसार पुरेपुर आडवे अंतर असायला पाहिजे.