पिक विमाधारक आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग – आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचीत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे १२० कोटी रु रक्कम प्रलंबीत आहे.गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर आला असून त्याआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने मंगळवार दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वा. ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिक विमाधारक आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर व संजय पडते यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-भारतातील-पहिल्या-फिश-थीम/
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांसाठी सन २०२२-२३ मध्ये ३८४६७ शेतकरी सहभागी झाले आहेत. १ डिसेंबरपासून विमा संरक्षणाचा कालावधी सुरू झाला. हा कालावधी १५ मे पर्यंत होता. शासन निर्णयानुसार पिक विम्याचा कालावधी संपल्याच्या ४५ दिवसानंतर अर्थात १ जुलैच्या दरम्याने पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देणे क्रमप्राप्त होते.मात्र पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे १२० कोटी रु रक्कम प्रलंबीत आहे. याबाबत आवाज न उठविल्यास सरकारकडून आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी माहिती आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांनी दिली.