फोटोओळी – बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांचा ६१वा स्मृतिदिन कार्यक्रमात वृंदा कांबळी यांनी मार्गदर्शन केले.
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला l प्रतिनिधी-
शैक्षणिक, राजकीय, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात अलौकीक कार्याचा ठसा उमटविणारे थोर शिक्षण तज्ज्ञ बॅ.बाळासाहेब खर्डेकर हेही खरे समाजसुधारक होते. त्यांनी आर्थिक फायदा न पाहता, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली. प्रसंगी आपल्याला मिळालेली पारितोषिके विकून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यांनी केले.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे संस्थापक व प्रथम प्राचार्य बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांचा ६१वा स्मृतिदिन कार्यक्रम प्राचार्य एम.बी.चौगले यच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी पेडणे-गोवा येथील निवृत्त विभागीय शिक्षणाधिकारी जयराम रेडकर, बॅ.खर्डेकर स्मृतिदिन समितीचे चेअरमन प्रा.राजाराम चौगले, पर्यवेक्षक दिलीप शितोळे, कलावलयचे अध्यक्ष बाळू खामकर, निवृत्त बँक अधिकारी सतिश डुबळे, विद्यार्थी मंडळ सचिव पवनकुमार राणे आदी उपस्थित होते.
बॅ.खर्डेकर यांनी वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी महाविद्यालयाची स्थापना करून जिल्ह्यातील मुलांना महाविद्यालयीन शिक्षणाची सोय केली. त्यामुळे त्यांचा स्मृतिदिन सण म्हणून साजरा करावा असे जयराम रेडकर यांनी सांगितले. प्राचार्य चौगले यांनी बॅ.खर्डेकर यांचा जीवनक्रम विविध दाखल्यांच्या माध्यमातून विषद केला. यावेळी बॅ.खर्डेकर स्मृतिदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामार्फत घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणा-या वेदश्री चव्हाण हिचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपविजेत्या सानिया वराडकर हिला प्रमाणपत्र देण्यात आले. प्राचार्य चौगले पुरस्कृत निबंध स्पर्धेतील विजेती टीना प्रभूखानोलकर व उपविजेती ज्योती पिगुळकर यांचाही गौरव करण्यात आला. जयराम अनंत रेडकर पुरस्कृत तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील प्रथम आलेल्या श्रावणी राणे, आकांक्षा गावडे व फाल्गुनी नार्वेकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जयराम रेडकर पुरस्कृत प्रा.एस.एन.शिरोडकर बेस्टस्टुडंट ऑफ द इयर अॅवॉर्ड तृतीय वर्ष विज्ञान शाखेची सोनाली चेंदवणकर हिला, तर बॅ.खर्डेकर स्कॉलर ऑफ द इयर अॅवॉर्ड रोशनी डिचोलकर हिला प्रदान करण्यात आला. मालवण येथे झालेल्या १९ वर्षाखालील जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक व अहवाल वाचन प्रा.राजाराम चौगले यांनी, मान्यवरांचा परिचय प्रा.सचिन परूळकर यांनी, सूत्रसंचालन प्रा.धनश्री पाटील तर आभार प्रा.दिलीप शितोळे यांनी मानले. यावेळी सुरेंद्र चव्हाण, प्रा.एम.एम.मुजूमदार, प्रा.शशांक कोंडेकर, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, वेंगुर्ल्यातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.