Kokan: “माती : जेथे अन्न सुरू होते.” – श्री.विकास धामापूरकर (शास्त्रज्ञ)कृषि विज्ञान केंद्र,सिंधुदुर्ग

0
14
"माती : जेथे अन्न सुरूहोते." जमीन जिवंत राहणे अत्यंत आवश्यक

जमीन जिवंत राहणे अत्यंत आवश्यक

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /

🔴माती हा सृष्टीचा मूलभूत आधार आहे. मानवी जीवनाच्या गरजा पूर्ण करण्याचे काम मातीवर आहे. मातीचे मानवी आरोग्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण कार्ये म्हणजे सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाचे उत्पादन आणि पर्यावरणीय प्रदूषणापासून संरक्षण करणे. मानवी आरोग्य हे माती – पाणी – वायू यांचे परस्परातील सातत्य यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. माती हा निसर्गातील सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यांची निर्मिती कुठल्याही कारखान्यात केली जाऊ शकत नाही. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाची निर्मिती जमिनीमध्ये होते आणि त्यांचा शेवट सुद्धा माती मध्येच होत असतो. तसेच प्रत्येक सजीवाला अन्न, वस्त्र आणि निवारा देण्याचे काम माती अनादी कालापासून करत आलेली आहे. म्हणून मातीला ‘माता’ म्हणून संबोधले जाते. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी स्वच्छ हवा, पाणी आणि एकुनच चांगल्या पर्यावरणाची आवश्यकता असते आणि हे चांगले पर्यावरण ठेवण्याचे काम माती करत असते. निसर्गातील प्रत्येक सजीवाचा जीवनक्रम पूर्ण झाल्यावर त्यांचे अवशेष आपल्या पोटामध्ये घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा धोका न पोहचवता पर्यावरण चांगले ठेवण्याचे काम माती आविरतपणे करत आहे. मातीच्या पोटामध्ये अनेक पदार्थ असतात. काही पदार्थ संजीवाना पोषक असतात, तर काही हानिकारक असतात. सूर्यप्रकाशामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असते. या बाष्पीभवनामुळे हानिकारक द्रव्ये परत न पाठवता आपल्याच पोटात साठवून ठेऊन पर्यावरण शुद्ध ठेवणाचे काम माती करत आहे. उन्हाळ्यात वाढलेले तापमान आणि हिवाळ्यात कमी झालेले तापमान नियंत्रित करण्याचे काम माती करत असते. परंतु मानवाच्या चुकीच्या शेती पद्धतीमुळे मातीचा ऱ्हास होत चाललेला आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर पुढच्या पिढीला माती शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मातीचे रक्षण करणे हे प्रत्येक माणसाचे कार्य आहे. आज ०५ डिसेंबर – ‘जागतिक मृदा दिवस’ या निमित्ताने जगभर माती ह्या संसाधनावर त्याच्या उपयोगितेबद्दल माहिती व्हावी यासाठी जगभर कार्यक्रम आयोजित केले आहेत. या वर्षीचे घोषवाक्य “माती : जेथे अन्न सुरू होते.” असे आहे. या मोहिमेचा उद्देश माती व्यवस्थापनातील वाढत्या आव्हानांना संबोधीत करून मातीची जागरूकता वाढवणे आणि समाजाला प्रोत्साहीत करून निरोगी परिसंस्था आणि मानवी कल्याण राखण्याच्या महत्त्वा बद्दल जागरूकता वाढवणे आहे. मातीचे आरोग्य सुधारणे, हे आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-जिल्ह्यात-इंग्रजी-विषया/

माती तयार होण्याची निसर्गातील क्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. मोठमोठ्या खडकांवर तापमान, पाणी, सजिव, बर्फ, वनस्पती, याची क्रिया होऊन शेवटी माती तयार होते. साधारणत: १ इंच माती तयार होण्यासाठी ६५० वर्षे लागतात, ज्या जमिनीमध्ये २५ टक्के हवा, २५ टक्के पाणी, ४५ टक्के खनिजद्रव्ये आणि ५ टक्के सेंद्रिय घटक असतात, त्या जमिनीला आदर्श जमीन संबोधले जाते. ही जमीन पीक उत्पादनासाठी सर्वात योग्य असते. कारण या जमिनीतून पिकांना आवश्यक ती सर्व पोषकद्रव्ये, पाणी यांचा योग्य पुरवठा होत असतो. परंतु माणसाच्या चुकीच्या शेती पद्धतीमुळे जमिनीचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याची कारणे पण वेगवेगळी आहेत. असंतुलित खतांचा वापर, सेंद्रिय घटकांचा कमी पुरवठा, बांध-बंदिस्ती न करणे, यामळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होऊन जमिनीचा वरचा थर वाहून जातो. एकाच जमिनीत दरवर्षी एकाच प्रकारचे पीक घेणे, पशूधनाच्या कमतरतेमुळे शेणखताचा पुरवठा कमी झालेला आहे. या सर्व बाबींचा परिणाम म्हणजे जमिनीचा जिवंतपणा कमी होत चाललेला आहे. जमिनीचा जिवंतपणा म्हणजे जमिनी मधील असंख्य जिवजंतु जे जमीन आपल्या वेगवेगळ्या कार्यामुळे जिवंत ठेवण्यासाठी मदत करतात. त्यांच्या या कार्यामुळे पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा होत असतो आणि या सर्वांमुळे मानवाची अन्नधान्याची गरज पूर्ण होत आहे.

जमिनीला आदर्श बनविण्याऱ्या एकातरी घटकाचे प्रमाण जर कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होत असतो. पाणी जास्त झाले तर जमीनीला जिवंत बनविणारे जिवाणू गुदमरून मरून जातील आणि हवेचे प्रमाण कमी होऊन त्याचा परिणाम जिवजंतूच्या कार्यावर होतो. सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी झाले तर जीवजंतुना अन्न पुरवठा कमी होतो. त्यामुळे पिकांचे पोषण पूर्ण होऊ शकत नाही. खनिजद्रव्य घटकांचे प्रमाण वाढून जमिनी टणक आणि कठीण होतील. ज्या जमिनी मध्ये सेंदिय घटकांचे प्रमाण जास्त असते त्या जमिनी मऊ असतात आणि अशा जमिनीमध्ये सूर्य प्रकाशाचे शोषण चांगले होते. जमिनीचे तापमान योग्य राखले जाते. त्यामुळे ह्या चार घटकांवर जमिनीची सुपिकता आणि उत्पादकता अवलंबून असते.

पीकवाढीसाठी १६ प्रकारच्या अन्नघटकांची आवश्यकता असते. ते घटक म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, बोरॉन, तांबे, जस्त, क्लोराईड, मँगनिझ व मॉलिबडेनम यापैकी एका जरी अन्नघटकाचे प्रमाण कमी जास्त झाले तर त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होत असतो . परंतु जमिनीच्या पोटामध्ये १०८ प्रकारची मूलद्रव्ये असतात आणि या १६ प्रकारच्या अन्नद्रव्यांचा पुरवठा या १०८ मूलद्रव्यांपासून होत असतो, या सर्व प्रक्रिया नियंत्रित करणारा एक घटक असतो, तो म्हणजे ‘हुयमस’. हुयमसमूळे पिकांना त्यांच्या गरजे एवढी अन्नद्रव्ये गरजेच्या वेळी उपलब्ध होत असतात. म्हणून जमिनी मध्ये हुयमसचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. हुयमसचे प्रमाण जमिनीच्या वरील चार घटकांच्या प्रमाणावर अवलंबून असते. म्हणून येणाऱ्या काळात जमिनीमध्ये हुयमसचे प्रमाण वाढविणे ही काळाची गरज आहे. ह्या साठी प्रत्येक माणसाने जमीनाचा गाभा समजून घेणे आवश्यक आहे. जमिनीचे कार्य आताच्या पिढीला समजावून सांगितले तरच येणाऱ्या काळात आपण आपल्या अन्नधान्याची गरज पूर्ण करू शकतो. संजीवाच्या जीवणामधील जन्म मृत्यू या घटना अटळ आहेत. कोणत्याही संजीवाचा जीवनकाळ पूर्ण झाल्यावर त्याचा जीव नष्ट होतो, तो निर्जीव होतो आणि ह्या निर्जीव घटकावर कुजण्याची क्रिया होते. हा जीव कुजून तो मातीत मिसळतो. परंतु ही कुजण्याची क्रिया फक्त जिवंत जमिनीमध्ये होते. निर्जीव जमिनीमध्ये कुजण्याची क्रिया होत नाही. परंतु ज्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवजंतु, गांडूळ आणि इतर प्राणी आहेत, त्या जमिनी मध्ये कुजण्याची क्रिया होऊन एकूणच पर्यावरण संरक्षण आणि चांगले ठेवण्यासाठी मदत होते. कोणत्याही संजीवाचे अवशेष जमिनीवर पडले किंवा जमिनीमध्ये मिसळले की जमिनीमध्ये असलेले जिवजंतु हे अवशेष कुजवतात आणि त्यातील अन्न घटकांचा पुरवठा पिकांना करतात. त्यामुळे जमीन ही जिवंत राहणे अत्यंत आवश्यक आहे.

पीक उत्पादनामध्ये पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. तसेच पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज आहे आणि प्रत्येक सजीवाला त्याच्या गरजेनुसार पाणी उपलब्ध करून देण्याचे काम माती करत आहे. जमिनीच्या पृष्ठ भागावर पडलेल्या पावसाचे पाणी आपल्या पोटामध्ये साठवून प्रत्येक सजीवाला उपलब्ध करून देण्याचे काम जमीन अविरतपणे करत आहे. जमिनीमधील पाणी दोन प्रकारे काम करते. वरच्या थरातील पाणी सजीवांची गरज भागवते आणि खालच्या थरातील पाणी तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. अशाप्रकारे माती अन्नघटकांबरोबर सजीवांना पाण्याचा पुरवठा करत असते. जमिनीमध्ये हवा, पाणी, सेंद्रिय पदार्थ, खनिज पदार्थ यांचे प्रमाण योग्य राहिले पाहिजे, यापैकी मुख्य घटक सेंद्रिय पदार्थ आहे. कारण तो जमिनीचा आत्मा आहे आणि हा आत्मा जमीन जिवंत राहण्यासाठी मदत करत असतो. या आत्म्यावरच जमिनीमध्ये असलेले जीवजंतु, गांडूळ त्यांचे प्रमाण आणि कार्य अवलंबून असते. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक माणसाने जमिनीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जमीन जिवंत कशी राहील या दृष्टीने डोळसपणे काम करणे आवश्यक आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here