आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून वेधले सभागृहाचे लक्ष
प्रतिनिधी – पांडुशेठ साटम
मुंबई – मृदू व जलसंधारण विभागामार्फत अधिकारी गट ब व अराजपत्रित पदासाठी दिनांक 20 व 21 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणारी परीक्षा पेपर फुटी मुळे अचानक रद्द करण्यात आली. परीक्षा केंद्रातील गैरप्रकार, खाजगी कंपन्यांचे मनमानी कारभार, पेपर फुटीच्या घटनांमुळे सरळ सेवा भरती हा प्रक्रिया वादग्रस्त असून बेरोजगारांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी शासनाने योग्य ती उपाययोजना करण्याबाबत सभागृहामध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला. या पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये शासनाने चौकशी करून दोषींविरोधात कोणती कारवाई केली व करण्यात येणार आहे याबाबत सभागृहामध्ये लक्ष वेधले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-लोणावळ्यातील-भुशी-डॅमम/
या प्रश्नावर सभागृहामध्ये उत्तर देताना गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सदर परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची परीक्षार्थी यांची मागणी विचारात घेऊन मृद व जलसंधारण विभागाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 15 मार्च 2024 रोजी घेतला असल्याचे उत्तरात सांगितले. सदर प्रकरणी ए.आर.एन. असोसिएट्स या परीक्षा केंद्राच्या व्यवस्थापकासह एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असल्याचे सभागृहामध्ये जाहीर केले. सदर प्रकरणी फेरपरीक्षा घेण्याबाबत व या परीक्षेची संबंधित गैरप्रकार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे यावेळी मा. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये उत्तर देताना स्पष्ट केले.