रत्नागिरी/🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार
ब्राऊन शुगरची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ३३,६०० रुपयांचे ४ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन जप्त करण्यात आले असून, ही कारवाई रविवारी दुपारी निवखोल रोड येथील एका हायस्कूलच्या मागे करण्यात आली. इबादुल्ला मुजीब पावसकर (२६, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मसुरे-येथे-१६-ऑक्टोंबर-रो/
त्याच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार शांताराम झोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी दुपारी १२:२५ वाजण्याच्या दरम्यान निवखोल रोड येथील हायस्कूलच्या पाठीमागे इबादुल्ला पावसकर हा ब्राऊन हेरॉईन घेऊन उभा होता. याबाबतची माहिती पोलिस हवालदार झोरे यांना मिळताच घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे एका प्लास्टिक पिशवीत ब्राऊन हेरॉईन हा अमली पदार्थ सापडला. त्याचे वजन ४ ग्रॅम असून, त्याची किंमत ३३,६०० इतकी आहे. हा साठा पोलिसांनी जप्त केला असून, याप्रकरणी त्याच्याविरोधात एन. डी. पी. एस. ॲक्ट कलम ८ (क), २२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
यापूर्वीही झाली होती कारवाई
रत्नागिरी शहरातील माळनाका ते थिबा रोड मार्गावर ४ ऑक्टोबर रोजी कारवाई करून १०,८५० रुपयांचे ब्राऊन हेरॉईन जप्त करण्यात आले होते. या मार्गावरील एका महाविद्यालयाच्या गेटजवळ तरुण विक्रीसाठी आला असता ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता निवखोल रोड येथील एका हायस्कूलच्या मागे कारवाई करण्यात आली आहे.