रत्नागिरी- रत्नागिरीत लवकरच १०० कोटींचे ९ मजली प्रशासकीय भवन उभाले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून मान्यता मिळाली असून, येत्या आठवडाभरात या भवनाचे भूमिपूजन केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पंचगंगेच्या-प्रदूषणमु/
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन आणि बक्षीस वितरणाप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत बोलत होते. ते म्हणाले, शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राज्यातील सर्वांत मोठी ९ मजली प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावीत आणि जिल्हाभरातून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वणवण कमी व्हावी या दृष्टीने ही इमारत बांधण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती पाडून या ठिकाणी पुण्याच्या धर्तीवर १ लाख ५० हजार चौरस फुटांची ९ मजली ही इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत ५० शासकीय कार्यालये असणार आहेत.
या प्रशासकीय इमारतीच्या सर्वात शेवटच्या मजल्यावर ६०० आसनक्षमतेचे नाट्यगृह बांधण्यात येणार आहे तसेच एका मजल्यावर पर्यटकांसाठी दालन असेल. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्याबाबतची सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे. पर्यटकांना येण्यासाठी या इमारतीत स्वतंत्र मार्ग असेल तसेच दिव्यांगांसाठीही स्वतंत्र मार्ग व व्यवस्था या इमारतीत करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.