⭐ सावंतवाडी वन विभाग व फिरतेपथक सांगली यांची संयुक्त कारवाई
सावंतवाडी । प्रतिनिधी-: रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांची निर्दयपणे शिकार करून इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या रोहित कोळी नामक युवकाला वन विभागाने सांगली मधून ताब्यात घेतले. https://sindhudurgsamachar.in/kokan-बीएसएनएल-टॉवरच्या-मागणी/
याबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या rohit_koli_shikarvala या इन्स्टाग्राम अकाउंटवर रानडुक्कर तसेच साळींदर यांची शिकार करून व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी रोहित कोळी याला अटक करण्यासाठी त्याचा माग काढत सावंतवाडी वन विभागाची टीम याबाबत कसून तपास करत होती. या तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदरचा युवक हा सांगली येथील असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सदर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी वन विभागाची टीम रवाना झाली. यानुसार फिरते पथक सांगली यांना सोबत घेऊन सापळा रचण्यात आला व त्यानुसार सोलापूर-सांगली हायवेवर रोहित कोळी व इतर ५ संशयितांना १० जिवंत रानडुकरांसह संयुक्त कारवाई करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदरच्या कारवाई मुळे जिवंत रानडुकरांची तस्करी करून मांसाची विक्री करणाऱ्या टोळीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.
सावंतवाडी उपवनसंरक्षक श्री.नवकिशोर रेड्डी यांचेमार्फत वन विभागाकडुन सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही समाज माध्यमावर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविषयी वन विभागाला तात्काळ माहिती द्यावी. शिकारीसारख्या अवैद्य कृत्याचे कोणत्याही स्वरूपात समर्थन करू नये. वन विभागाचे सायबर सेल देखील अशा आक्षेपार्ह पोस्ट बाबत दखल घेत असून याबाबत समाजमाध्यम वापरकर्त्यांनी सजग रहावे.
सदरची कारवाई ही मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर(प्रा.) श्री.आर. एम. रामनुजम, उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, फिरतेपथक सांगली वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, पोलिस हवालदार गौरेश राणे, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, महादेव गेजगे, प्रकाश रानगिरे, वाहनचालक रामदास जंगले तसेच मेळघाट सायबर सेलचे वनरक्षक आकाश सारडा यांच्या पथकाद्वारे यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.