वेंगुर्ला ।प्रतिनिधी
वायंगणी समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले कासव तोंडात स्टीलचा मोठा गळ अडकलेल्या स्थितीत आढळले असता येथील कासव मित्र सुहास तोरसकर , जयानंद तोरसकर व जितेंद्र पेंडूरकर कुटुंबीय यांनी सदर जखमी कासवाच्या तोंडातून तो गळ शर्तीच्या प्रयत्नानंतर अलगद काढून प्राथमिक उपचार करून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले. कासव मित्र सुहास तोरस्कर हे जणू कासवांचे तारणहार बनले आहेत.
वायंगणी -हुलमेख वाडी समुद्रकिनारी ४ एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास दुर्मिळ ऑलिव्ह रिडले मादी कासव समुद्रकिनारी अंडी लावून जात असताना सदर मादी कासवाच्या वेगळ्या हालचालीवरून तिचे मोबाईल टॉर्च द्वारे निरीक्षण केले असता सदर कासवाच्या तोंडात व नाकात एक मोठा स्टीलचा गळ अडकलेल्या स्थितीत दिसून आला तात्काळ येथील कासवमित्र सुहास तोरसकर ,जयानंद तोसरकर आणि जितेंद्र पेंडूरकर कुटुंबीय यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांतून तो कासवाच्या तोंड व नाकात अडकलेला स्टीलचा मोठा गळ अलगद काढून त्या कासवावर प्राथमिक उपचार करून नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले. गेली ३० वर्षे कासवमित्र सुहास तोरसकर आणि मित्रमंडळ यांनी जाळ्यात अडकलेल्या कासवांना,जखमी कासवांना, जखमी समुद्री पक्षी यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले असून त्याचे हे काम अविरतपणे चालू आहे.
फोटो ओळी : मादी कासवाच्या तोंड व नाकात अडकलेला स्टीलचा गळ.