मुंबई- महाराष्ट्र विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी येत्या जूनमध्ये निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत विविध मतदारसंघांमध्ये राजकीय तडजोडींचा भाग म्हणून बड्या नेतेमंडळींकडून अनेकांना विधान परिषदेचा लॉलीपॉप सध्या दिला जात आहे. लोकसभेला आम्हाला मदत करा, विधान परिषदेत तुम्हाला संधी देऊ, असा शब्द दिला जात आहे. एखाद्या स्थानिक नेत्याला विधानसभेत ‘ॲडजेस्ट’ करणे स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे शक्य नसेल तर त्याला विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन दिले जात आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-पुढील-तीन-दिवस-वाढणार-उका/
काही ठिकाणी संभाव्य बंड थंड करण्यासाठी, काही ठिकाणी ४०-५० हजार मतांची ताकद राखणाऱ्या नेत्याला आपल्या जवळ ठेवण्यासाठी ‘जूनमध्ये विधान परिषदेची निवडणूक आहे, तिथे तुम्हाला संधी देऊ’ असा परस्पर सामंजस्य करार केला जात आहे. ११ आमदारांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत २७ जुलैला संपणार आहे. साधारणत: मुदत संपण्याच्या एक महिना आधी ही निवडणूक होते. हे लक्षात घेता जूनअखेर ११ जागांची निवडणूक होईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागेल, त्यानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशन काळात किंवा ते संपल्यानंतर लगेच विधान परिषदेची निवडणूक होईल. आमदारकीचा शब्द ज्यांना दिला गेला आहे त्यांना खरेच संधी दिली गेली तर सध्याच्या ११ आमदारांपैकी काहींना पुन्हा संधी नाकारली जाऊ शकते.
‘या’ आमदारांची २७ जुलै रोजी संपणार मुदत
बाबा दुर्राणी (अजित पवार गट), वजाहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), मनीषा कायंदे (शिंदेसेना), अनिल परब (उद्धवसेना), भाई गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), जयंत पाटील (शेकाप) आणि महादेव जानकर (रासप)