दापोली- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा दापोलीच्या वतीने नुकताच दापोली व करंजाणी प्रभागस्तरीय स्नेहसंमेलन व नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा दापोलीचे अध्यक्ष संदीप जालगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी दोन्ही शिक्षण प्रभागांतील अनेक नवनियुक्त शिक्षण सेवक व शिक्षक उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-10-कोटी-रुपये-खर्च-करून-बां/
जालगाव, दापोली येथील गोल्ड व्हॅली सेंट्रल पार्कच्या सभागृहात पार पडलेल्या या नवनियुक्त शिक्षण सेवकांचे स्वागत व स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठीच्या व्यासपीठावर अध्यक्ष संदीप जालगावकर यांचेसह दापोली शाखेचे माजी अध्यक्ष जीवन सुर्वे, तालुका सचिव गणेश तांबिटकर, कार्याध्यक्ष सुदेश पालशेतकर, कोषाध्यक्ष महेंद्र खांबल, तालुका संपर्क प्रमुख महेश गिम्हवणेकर, प्रसिद्धी प्रमुख बाबू घाडीगांवकर, महिला आघाडी अध्यक्ष नम्रता चिंचघरकर, सल्लागार भरत गिम्हवणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस बाबू घाडीगांवकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर दापोली व करंजाणी प्रभागात नवनियुक्त झालेल्या सर्व शिक्षण सेवक शिक्षकांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. नवनियुक्त शिक्षण सेवकांस भेडसावणाऱ्या समस्या व त्यांच्यापुढील आव्हानांवर या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. एकशे दहा वर्षांचा ज्वलंत इतिहास व परंपरा लाभलेल्या आणि महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठ्या, कर्तृत्ववान व बलशाली शिक्षक संघटनेत सामील झाल्याबद्दल सर्व शिक्षण सेवकांचे आभार मानतानाच शिक्षण सेवकांच्या सर्व वैयक्तिक व प्रशासकीय समस्या तसेच अडचणींच्या वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही संघटना निश्चितच आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभी असल्याचे आश्वासन व खात्री अध्यक्ष संदीप जालगावकर यांनी व्यक्त केली.
याशिवाय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांसाठी केलेल्या ठळक व भरीव कामगिरीची माहितीही उपस्थित नवनियुक्त शिक्षकांना दिली. शिक्षक नियुक्तीच्या काळात संदीप जालगावकर व शिक्षक संघाने आपणास वेळोवेळी आवश्यक मदत व सहकार्य केले असल्याचे अनेक शिक्षण सेवकांनी आपल्या मनोगतात सांगितले. या कार्यक्रमात जीवन सुर्वे, गणेश तांबिटकर, महेश गिम्हवणेकर, भरत गिम्हवणेकर, नम्रता चिंचघरकर आदींनी मनोगत व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज वेदक यांनी केले तर तालुका सचिव गणेश तांबिटकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.