दापोली– महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही महाराष्ट्रातील किंबहुना देशातील मातृसंघटना आहे. या संघटनेस सुमारे ११० वर्षांचा इतिहास आहे. आजही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही महाराष्ट्रातील सर्वाधिक शिक्षक सभासद असलेली व सर्वाधिक जिल्हा शाखा असलेली संघटना आहे. आचार्य अत्रे, आचार्य दोंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, शिवाजीराव पाटील, संभाजीराव थोरात यांसारख्या कर्तृत्ववान महापुरुषांनी या संघटनेचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न, समस्या सोडविण्याची धमक केवळ याच संघटनेत आहे आणि वेळोवेळी ही धमक सर्वांनी पाहिली आहे. या संघटनेच्या राज्य अधिवेशनात व्यासपीठावर अर्ध्याहून अधिक मंत्रिमंडळ उपस्थित असते. दोन लाखांहून अधिक शिक्षक प्रत्येक अधिवेशनात उपस्थित राहतात. अशा विशाल संघटनेचा सभासद बनणे ही कोणत्याही नवनियुक्त शिक्षकासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे स्पष्ट प्रतिपादन दापोली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप जालगावकर यांनी केळशी येथील नवनियुक्त प्राथमिक शिक्षकांच्या स्वागत मेळाव्यात बोलताना केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-अणसूरपाल-हायस्कूलमध्ये/
दापोली तालुक्यातील आंजर्ले प्रभागात नवनियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांचे स्वागत करण्यासाठी नुकतेच केळशी येथे आंजर्ले प्रभागस्तरीय स्वागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित केलेल्या स्वागत समारंभासाठीच्या व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे दापोली तालुका अध्यक्ष संदीप जालगावकर, माजी तालुकाध्यक्ष जीवन सुर्वे, शिक्षक नेते अविनाश मोरे, तालुका सचिव गणेश तांबिटकर, कोषाध्यक्ष महेंद्र खांबल, कार्याध्यक्ष सुदेश पालशेतकर, प्रसिद्धी प्रमुख बाबू घाडीगांवकर, सचिन नावडकर, तालुका संपर्क प्रमुख महेश गिम्हवणेकर, तालुका महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी मोरे, मधुरा सोमण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आंजर्ले प्रभागातील सर्व शिक्षण सेवकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याशिवाय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघासारख्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिक्षक संघटनेत सामील झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाविषयी माहिती देताना संदीप जालगावकर, अविनाश मोरे, जीवन सुर्वे, गणेश तांबिटकर, महेश गिम्हवणेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. या स्वागत मेळाव्यासाठी आंजर्ले प्रभागातील अनेक शिक्षक उपस्थित होते. स्वागत समारंभाचे सूत्रसंचालन आंजर्ले प्रभाग संघटक आनंद रोहे यांनी केले तर संदीप तळदेवकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.