देवगड:-मयत सौ. संजना सागर परब रा. किंजवडे (भरडवाडी) हिचा दि. १२/०४/२०२३ रोजी सासरचे घरी संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झाला होता. सदर कामी मयत सौ. संजना हिचे वडील गंगाराम राजाराम कदम यांनी मयतीचे पती व सासू-सासरे यांचेवर संजना हिची हत्या केल्याचा आरोप करणारी फिर्याद देवगड न्यायालयात दाखल केली होती. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-अॅडव्होकेट्स-फ/
मे. देवगड प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी सौ. एन. बी. घाडगे यांनी फिर्यादीचा अर्ज मंजूर करत देवगड पोलीसांना फौजदारी प्रक्रीया कायदा कलम १५६ (३) अंतर्गत संजना परब हिच्या मृत्यूचा ३ महिन्यांत तपास करण्याचा आदेश दिला आहे. सदर कामी फिर्यादीचे वतीने अॅड. कौस्तुभ मराठे यांनी युक्तीवाद केला होता.
सौ. संजना सागर परब हिचा मृत्यू नैसर्गिक झाला नव्हता. मयतीचे पोस्ट मॉर्टम रिपोर्ट मध्ये मणक्याचे हाड तुटलेले आढळले होते. तसेच तिच्या गळत्राभोवती काळया खुणा होत्या. मयतीला प्रथम सरिता हॉस्पिटल या खाजगी दवाखान्यात व त्यानंतर देवगड शासकीय रुग्णालयात आणले होते. मात्र तिथे ती मृत घोषित करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी व्हिसेरा राखून न ठेवता परस्पर मृतदेह जाळण्यासाठी सासरच्या लोकांकडे देऊन टाकला होता. मयत संजना हिचा मृत्यू कसा झाला याबद्दल आईवडीलांना काहीही न कळवता परस्पर अंतिम संस्कार करण्यात आले होते. त्यामुळे संजनाचा मृत्यू घातपात आहे अशी फिर्याद देवगड पोलीस स्टेशन येथे मयतीचे वडीलांनी दि. २२/०५/२०२३ रोजी केली होती.
मात्र देवगड पोलीसांनी फिर्यादीचे तक्रारीची दखल घेतली नव्हती. त्यामुळे फिर्यादीने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडेही तक्रार केली होती. मात्र तरीही पोलीसांनी कोणताही तपास केला नाही. त्यामुळे अखेरीस मयतीचे वडील गंगाराम कदम यांनी देवगड न्यायादंडाधिकारी न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती. वरील सर्व बाबी मे. न्यायालयाने विचारात घेवून विहीत मुदतीत पोलीस तपास करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी लवकरच खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.