🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार – – म्हापण/संदीपचव्हाण- विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून नक्की कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.एकिकडे शिवसेने कडून विद्यमान आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु महाविकास आघाडीकडून नक्की कुणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष लागून राहिल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्ते मात्र संभ्रम अवस्थेत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चनाताई घारे परब या गेली सात वर्षे संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत गोरगरिबांचे प्रश्न जाणून घेत मार्गी लावत होत्या . तसेच नुकत्याच काढण्यात आलेल्या जागर यात्रेच्या समारोप वेळी खासदार अमोल कोल्हे व जयंत पाटील यांना आमंत्रित केल्याने महाविकास आघाडीकडून प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडत कोणत्याही परिस्थितीत दिपक केसरकर यांना पराभव करून उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी उबाठा सेनेत प्रवेश केलेल्या राजन तेलीमुळे उत्सुकता वाढली आहे. तर गेले काही दिवस भाजपचे प्रामाणिक पणे काम करत आपले राजकीय भवितव्य घडविण्यासाठी वाटचाल करत असलेले भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब हे ही विधानसभा लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील निवडणूक हि तिरंगी होणार की चौरंगी होणार याकडे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा लक्ष लागून राहिला आहे.
तसेच भाजप मध्ये राजन तेली यांना मानणारा ग्रामीण भागात मोठा गट असून तो सध्या भाजप मध्ये असल्याने काही कार्यकर्त्यांच्या मते जो पर्यंत राजन तेली यांची उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत भाजप पक्ष न सोडण्याचे संकेत दिले जाते आहेत.त्यामुळे नक्की उमेदवार कोण यामुळे ग्रामीण भागातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र संभ्रम अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.