🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/हुमरमळा-
प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही हुमरमळा श्री देव रामेश्वर मंदिर येथे सोमवार दि. १८ नोव्हेंबर रोजी, वार्षिक जत्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सकाळी, धार्मिक विधी, सायंकाळी पुराण, व पालखी, ग्रामस्थांची भजने व रात्री १ वा. चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक,व पहाटे दहीकाला, असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देसाई – गावकरी, देवस्थान सदस्य, आदीं कडुन करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सावंतवाडी-विधानसभा-मतदा-4/
⭐देवालया विषयी थोडक्यात घेतलेला थोडक्यात आढावा –
🟣सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-पाट मार्गावर हुमरमळा गाव वसलेले आहे. श्री देव रामेश्वर हेच या गावचे ग्रामदैवत, पर्यटनदृष्ट्या समृद्ध असलेल्या कुपीच्या डोंगरालगत दक्षिणेकडे श्री देव रामेश्वराचे नितांत सुंदर आणि शांत शिवालय आहे. देवालयाच्या जवळच वहाणाऱ्या निर्झरीमुळे देवालयाची शोभा अधिकच खुलते.
उपलब्ध माहितीनुसार अंदाजे २०० वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली असावी असा कयास आहे, तर मंदिराचा जीर्णोद्धार माघ कृष्ण पंचमी, शके १८८२ या दिवशी करण्यात आला. १९७१ या वर्षी थोर समाजसेवक ,उद्योगपती पंत वालावलकर यांनी चंदनाच्या लाकडापासून बनवलेला मनमोहक रथ श्री देव रामेश्वर चरणी अर्पण केला. ४ घोडे असलेल्या रथाचे स्वतः सारथ्य करणारे भगवान श्रीकृष्ण आणि ध्वजस्तंभावर प्रत्यक्ष मारुतिराया विराजमान असलेला हा रथ म्हणजे कलाकुसर अन् रंगसंगती यांचे उत्कृष्ट उदाहरणच आहे.
अत्यंत जागृत असलेल्या या श्री देव रामेश्वराच्या मंदिरात शिवशंकराच्या पिंडीवर नित्य पूजा केली जाते, तर उत्सव कालावधीत श्रींच्या उत्सवमूर्तीची पूजा केली जाते. देवालयात गणपति आणि मारुतिराय यांच्या मूर्तीही आहेत, तसेच आवारात दत्त पादुकांचे स्थान आहे. प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून श्री रामेश्वराला गुळचून (एकत्र केलेले गुळ आणि खोबरे संपूर्ण) अर्पण केले जाते. मंदिरासाठी सागवानी लाकूड वापरण्यात आले आहे. म्हणूनच कि काय, गावातील ग्रामस्थ स्वतःच्या घराच्या बांधकामात सागवानी लाकूड वापरत नाहीत. पूर्णं वर्षभरात जवळपास २१८ जागर या मंदिरात होतात, तसेच दहीकाला, हनुमान जयंती, गुढीपाडवा, होलिकापूजन, तुलसीविवाह, जीर्णोद्धार दिन आदी उत्सव येथे साजरे होतात, तरीही महाशिवरात्रोत्सव काही वेगळाच असतो.
पूर्वी केवळ महाशिवरात्रीच्या दिवशीच ग्रामस्थ आपापल्या घरातून धान्य आणून मंदिराच्या ठिकाणी ते शिजवत आणि तो महाप्रसाद ग्रहण करून नंतर भजन, पालखी, पुराण, कीर्तन आदी कार्यक्रम झाल्यानंतर घुगरे प्रसाद म्हणून वाटून शिवरात्र साजरी केली जायची. कालानुरूप त्यात बदल होत गेले. आता शिवरात्रोत्सव ५ दिवसांचा साजरा होतो. शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद केला जातो. जवळपास ६ ते ७ सहस्रांहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. रात्री रथोत्सव हे मुख्य आकर्षण असते. आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथातून ‘श्रीं’ची रथयात्रा निघते, तेव्हा हे दृश्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी सहस्रावधी भाविक उपस्थित असतात.