प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
⭐डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी
मसुरे /प्रतिनिधी-आडवली पशुवैद्यकीय दवाखाना ते समर्थ गड स्वामी समर्थ मठ- त्रिंबक घाडीवाडी सापळे मार्ग या रस्त्याला डांबरीकरणाची प्रतीक्षा आहे. खडीकरण पूर्ण झालेल्या या रस्त्यावर लवकरात लवकर डांबरीकरण पूर्ण करावे अशी मागणी हजारो स्वामी भक्त तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.सदर मार्गावर आडवली समर्थगड स्वामी समर्थ मठ असून नियमित शेकडो स्वामी भक्त मठामध्ये येत असतात. प्रत्येक गुरुवारी रात्री महाआरती साठी सुमारे दोन हजार पेक्षा जास्त भक्त हजर असतात. हीच संख्या मे महिन्यात पाच हजारच्या आसपास असते. https://sindhudurgsamachar.in/kokan-भरतगड-इंग्लिश-मिडीयम-येथ/
जिल्हा तसेच जिल्हा बाहेरून येणाऱ्या अनेक स्वामी भक्त, भाविक पर्यटक याना मातीच्या रस्त्यातून येताना धुळीचा सामना करावा लागतो. तसेच ग्रामस्थांची वस्ती सुध्दा या ठिकाणी असून नव्याने अनेक घरे बांधली जात आहेत. दरम्यान ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद स्तरावर माजी जी प सदस्य महेंद्र चव्हाण, माजी प स सदस्य राजू परुळेकर तसेच इतर लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा शासनाकडे या रस्त्या साठी पाठपुरावा करण्याचे काम केले आहे. सदर मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असून आडवली ते त्रिंबक हे अंतर कमी करणारा आहे. शासनाने याबाबत त्वरित निर्णय घेत सदर मार्गाचे डांबरीकरण तातडीने पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ, स्वामी भक्त यांच्या मधून होत आहे.
फोटो: आडवली स्वामी समर्थ मठ येथील याच रस्त्याला डांबरीकरण होणे आवश्यक आहे.