⭐१५ मेल-एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही थांबा नाही? ⭐जाहीरनाम्यात रेल्वेगाड्या आणि थांब्यांचा समावेश करून ते पूर्ण करण्याचे आश्वासन देणारा उमेदवार कोकणातील खासदार असणार
सिंधुदुर्ग- मुंबई महानगर प्रदेशासह कोकणातील प्रमुख जिल्ह्यांतून जाणार्या कोकण रेल्वेचा कोकणवासीयांना फायदा होत नाही. १५ मेल-एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही थांबा नाही. तर रायगडमधून धावणार्या २३ गाड्यांना थांबा नाही. त्यामुळे थांब्यांसह अन्य मागण्यांचा समावेश जाहीरनाम्यात करेल तोच आमचा खासदार असेल, अशी भूमिका कोकण रेल्वेच्या प्रवासी संघटनांनी घेतली आहे. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-नौदलाची-समुद्र/
कोकणातील जिल्ह्यांतून धावणार्या कोकण रेल्वेमुळे केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक-कारवारपर्यंतच्या प्रवासात आठ तासांची बचत झाली आहे. मात्र या रेल्वेला सिंधुदुर्गातील एकही स्थानकात थांबा का देण्यात आला नाही ? असा प्रश्न कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र नेमळेकर यांनी उपस्थित केला आहे. गाड्या, थांब्यांबाबत होणार्या अन्यायामुळे रेल्वेच्या थांब्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. यामुळे जाहीरनाम्यात रेल्वेगाड्या आणि थांब्यांचा समावेश करून ते पूर्ण करण्याचे आश्वासन देणारा उमेदवार कोकणातील खासदार असणार आहे. त्यालाच कोकणी माणूस मतदान करेल, यावर प्रवासी संघटनांचे एकमत झाले आहे, असे संघटनांनी सांगितले.
रेल्वे प्रशासन थांब्यांचे समान वाटप करण्याचा दावा करते, मात्र अनेक गाड्यांना पेण, महाड, संगमेश्वर,लांजा, राजापूर आणि वैभववाडी स्थानकांचा थांबा नाही. माणगाव, खेड, सावंतवाडीतही मोजक्याच गाड्या थांबतात. कोकण रेल्वेच्या उभारणीत महाराष्ट्राने गोवा, कर्नाटक, केरळपैकी सर्वाधिक म्हणजेच २२ टक्के आर्थिक वाटा उचलला आहे. तरी वाढीव गाड्या, थांबे कमी आहेत, असे कोकण रेल्वे प्रवासी समिती सदस्य अक्षय महापदी यांनी सांगितले. मुंबई लोकल स्थानकांच्या नामकरणासह सावंतवाडी टर्मिनसचे मधू दंडवते टर्मिनस असे नामकरण होणे अपेक्षित होते.मात्र ते होऊ शकले नाही. यामुळे कोकणासाठीच्या जाहीरनाम्यात मधू दंडवते टर्मिनसची मागणी पूर्ण करण्याबाबत विश्वास निर्माण करेल, प्रश्न सोडवेल, त्यालाच मत देणार व तोच कोकणातील खासदार असेल, असे कोकण रेल्वे प्रवासी संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी सांगितले.