वेंगुर्ला प्रतिनिधी- येथील रा.कृ.पाटकर हायस्कूल आणि रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेजच्या तांत्रिक विभागाकडील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अनंत वसंत स्वार उर्फ राजन स्वार हे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदिर्घ सेवेतून ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सेवानिवृत्तपर सत्कार करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/kokan-दिव्यांग-लोकप्रतिनिधीं/
श्री.स्वार हे चतुर्थश्रेणी कर्मचारी असले तरी त्यांना कार्यालयीन कामाचा प्रचंड अनुभव होता. कार्यालयीन ईमेल, पत्रव्यवहार, दाखले तयार करणे, दहावी-बारावी परीक्षा कामकाज, केंद्रस्तरावरील कामकाज यामध्ये हातखंडा होता. शाळेच्यावतीने मुख्याध्यापक आत्माराम सोकटे यांच्या हस्ते राजन स्वार यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या कामकाजाची उणिव शाळेला नेहमीच जाणवेल असे उद्गार श्री.सोकटे यांनी काढले. तर गरजेच्यावेळी शाळेला माझे नेहमीच सहकार्य राहील असे आश्वासन श्री. स्वार यांनी दिले. सत्कारप्रसंगी प्रा. महेश बोवलेकर, बाबूराव खवणेकर, तुषार कामत, रामचंद्र घोगळे, आप्पासाहेब सुतार, कमलाकर सातार्डेकर, विजय सावंत यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी श्री.स्वार यांनी शाळेला ४ फॅन, ४ ट्युबलाईट, २ फ्लड लाईट व इन्व्हरटरसाठी आर्थिक स्वरूपात मदत केली. तर विद्यमान व माजी उपस्थित कर्मचा-यांना भेटवस्तू दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.महेश बोवलेकर यांनी तर आभार प्रा.विलास गोसावी यांनी मानले.
फोटोओळी – सेवानिवृत्तीबद्दल अनंत स्वार यांचा सत्कार करण्यात आला.