⭐केळूस व मुणगी माईनवाडा गावाला वरदान ठरणार्या बापाडतेवाडी तारीसाणा वनराई बंधा-याचे काम पुर्ण…..
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यात बुधवार ८ जानेवारी २०२५ हा बंधारा दिवस म्हणून साजरा करण्याचे नियोजन पंचायत समिती स्तरावर करण्यात आल्यानुसार केळूस बापडतेवाडी तारीसाणा बंधा-याला पंचायत समिती वेंगुर्लाचे मा.गटविकास अधिकारी श्री. दिनेश पाटकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री. प्रफुल्लकुमार शिंदे, लघुपाटबंधारे (जलसंधारण) विभागाचे उपअभियंता श्री. मंगेश हवालदार, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. प्रितम पवार, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. गणेश महाडेश्वर, पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकारी सुप्रिया कोरगावकर, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी श्री. सखाराम सावंत, तालुका कृषी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक श्री. शंकर नाईक, केळूस कृषीसहाय्यक श्रीम.स्नेहल रगजी यांनी भेट दिली. यावेळी केळूस सरपंच श्री. योगेश शेटये, केळूस ग्रामपंचायत अधिकारी श्री. विवेक वजराटकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. नारायण मोबारकर, श्री. अंकुश मुणनकर, ग्रामस्थ श्री. जगन्नाथ पावसकर, श्री. शेखर प्रभूकेळूसकर, श्री. भिवा केळूसकर यांच्यासह बंधा-याचे काम करणारे ग्रामस्थ उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-गावा-गावातील-प्राथमिक-शा/
केळूस गावात बापाडतेवाडी तारीसाणा येथे वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात मोठा समजला जाणारा वनराई कच्चा बंधारा बांधण्यात येतो, गेल्या ४० ते ४५ वर्षाची पंरापरा गावातील ग्रामस्थ जोपासत असून ग्रामपंचायत केळूस, ग्रामपंचायत आंदुर्ले व या भागातील ग्रामस्थांच्या सहभागातून साधारणत: ३४ मीटर लांबीचा व १.५ मीटर उंचीचा बंधारा बांधण्यात येतो, पुर्वीच्या काळात याठिकाणी झाडांच्या फांद्या (कवळकाटी) व मातीचा वापर करुन बंधारा बांधला जात होता. कालांतरांने अलिकडच्या २० वर्षात सिंमेटच्या रिकाम्या गोण्या व मातीचा वापर करुन हा कच्चा बंधारा बांधला जातो. साधारणत: ४००० सिमेंटच्या रिकाम्या गोण्या या बंधाऱ्यासाठी लागतात. या आवश्यक असणाऱ्या रिकाम्या सिंमेट गोण्या ग्रामपंचायत केळूस व ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या माध्यमातून पुरविल्या जातात, तर लोकसहभागातून शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यामाध्यमातून ६० ते ६५ हजार रूपये लोकवर्गणी गोळा करुन बंधारा बांधण्याचे नियोजन केले जाते. या बंधाऱ्याचा उपयोग केळूस गावातील बापाडतेवाडी, देऊळवाडी, मधीलवाडी व डीमवाडी तसेच आंदुर्ले गावातील मुणगी, माईनवाडा,भगतवाडी या भागातील शेतकरी माड बागायतदार, पशुपालक यांना होतो, साधारणत: १०० हेक्टर क्षेत्रातील नारळ, सुपारी, केळी व भात, भुईमूग तसेच भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने कच्च्या शेतपाटाद्वारे बंधाऱ्यात साठवणूक केलेले पाणी शेती बागायतीला मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोटारपंप/विजेचे बिल/डिझेल आदी सर्व बाबींचा खर्च वाचविण्यात या ठिकाणी यश येत आहे. साधारणत: बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला एक किलोमिटर क्षेत्रापर्यत पाण्याचा विस्तार होत असल्याने या भागातील माडबागायती, शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या विहीरींची पाणी पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे पाणीटंचाई सारख्या समस्येला सुद्धा पुर्णविराम मिळतो. तसेच बंधाऱ्याच्या मोठ्या प्रमाणात साठणाऱ्या पाण्यामुळे याभागात पाळीव जनावरांबरोबरच पशुपक्षी सुद्धा आपली तहान भागवण्यासाठी येतात. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेले विविध पक्षी याकाळात या भागात पहावयास मिळतात त्यामुळे पक्षीप्रेमींना सुध्दा ही पर्वणीच आहे.
या भागातील शेतकऱ्यांच्या/बागायतदारांचा एकीमुळे आतापर्यत हा कच्चा बंधारा बांधणे शक्य होत आहे. परतुं सद्यस्थितीत वाढती महागाई व मजुरी यांचा विचार करता त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेला हा कच्चा बंधारा बांधण्यासाठी होणारा खर्च तसेच शासनाच्या माध्यमातून गावात असणा-या नळपाणी योजनेच्या उद्भव विहीरीचा पाणी साठा आदी बाबी लक्षात घेऊन या वनराई बंधाऱ्याची दखल घेवून या भागात शासनाच्या माध्यमातून कायमस्वरुपी बंधारा बांधण्यात आल्यास दरवर्षी पाणी साठवणूक करणे सुलभ होईल. जेणेकरुन शेतकऱ्यांची / बागायदारांची गैरसोय दुर होईल व पाण्याच्या समस्येतून केळूस व आंदुर्ले ही दोन गावे मुक्त होतील.