वेंगुर्ला येथे पहिल्या अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलनाचे उद्घाटन
वेंगुर्ला प्रतिनिधी- दशावतार हे मराठी नाटकांचे उगमस्थान असून ते कोकणच्या भूमीतूनच निर्माण झाले आहे. दशावतारामध्ये खूप बदल होत आहेत. त्यामुळे नव्या पिढीने पारंपारिक दशावतार सांभाळणे आवश्यक आहे. विविध समस्यांसाठी दशावतार कलाकारांनी शासन दरबारी लढा उभारावा. त्यासाठी आपले सर्वोतोपरी सहकार्य राहील असे प्रतिपादन दशावतार लोककलेवर पहिली डॉक्टरेट पदवी संपादन करणारे वेंगुर्ल्याचे सुपुत्र अॅड.डॉ.अशोक भाईडकर यांनी पहिल्या अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-राष्ट्रवादी-काँग्रेसचे/
अखिल भारतीय दशावतार नाट्य परिषद आणि संशोधन संस्था व वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले अखिल भारतीय दशावतारी नाट्यसंमेलनाला आजपासून येथील साई मंगल कार्यालयात प्रारंभ झाला आहे. संमेलनापूर्वी पाटकर हायस्कूल, बाजारपेठ मार्गे साई मंगल कार्यालयापर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली. यात दशावतार वेशभूषा केलेली मुले, नाट्य कलाकार, शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपिठावर अॅड.डॉ.अशोक भाईडकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपयंत्र अभियंता, कणकवली विभाग कार्यालयाचे सुजित डोंगरे, दशावतारातील पितामह यशवंत तेंडोलकर, भजनसम्राट भालचंद्र केळुसकरबुवा, वेंगुर्ला पोलिस स्टेशनचे मनोज परूळेकर आदी उपस्थित होते.
नविन पिढीने दशावतार कला टिकविण्यासाठी कटिबद्ध रहा. या कलेला राजाश्रय मिळविण्यासाठी नगरपरिषदेतर्फे आमचे नेहमीच सहकार्य राहील. तसेच भविष्यात वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने दशावतारी नाट्य महोत्सव भरविला जाणार असल्याचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी जाहीर केले. दशावतारी कलाकारांनी अशा नाट्य संमेलनास जास्तीत जास्त उपस्थित राहून त्याचा फायदा करून घ्यावा असे भालचंद्र केळुसकर यांनी सांगितले. कामगार कल्याणचे केंद्र संचालक संतोष नेवरेकर यांनी सर्व नाट्य कलाकारांनी महाराष्ट्र कामगार निधी भरून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या संमेलनात ज्येष्ठ दशावतारी कलावंत खलनायकीचा बुलंद आवाज तुकाराम गावडे, विविधांगी गाणी आणि अख्यान देणारे कणकवलीचे सुपुत्र भाई सामंत, पहिले आत्मचरित्र लिहिणारे गोव्याचे सुपुत्र मास्टर दामू जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी जयसिंग राणे आणि महाराष्ट्र शासन कलादान पुरस्कार विजेते यशवंत तेंडोलकर यांचा तसेच खानोलकर दशावतार मंडळाचे बाबा मेस्त्री, चेंदवणकर गोरे दशावतार मंडळाचे सुधाकर दळवी, लंगार नृत्य स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून लाभलेले पपू नांदोसकर, महेश गवंडे, ग्रंथदिडीला सहकार्य करणारे प्रा.महेश बोवलेकर, प्रा.विलास गोसावी यांच्यासह व्यासपिठावरील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुजा तेंडोलकर, पत्रकार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
उद्घाटनंतर संमेलनाध्यक्ष अॅड.डॉ.अशोक भाईडकर यांच्या ‘दशावतार‘ पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचे आणि ‘स्पर्श‘ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दरम्यान, ग्रंथदिडीवेळी घेतलेल्या दशावतार वेशभूषा स्पर्धेत प्रथम-सेजल रेडकर (रूक्मिणी), द्वितीय-दिपेश वराडकर (मारूती), तृतीय-रूद्र म्हापणकर (राजा), उत्तेजनार्थ-वीर गावडे (ब्रह्मराक्षस), नैतिक नाईक (कृष्ण), रसिका गुरव (पार्वती) यांनी क्रमांक पटकाविले.
कार्यक्रमाचे निवेदन प्रा.वैभव खानोलकर यांनी तर स्वागत प्रा.सचिन परूळकर व महेश राऊळ यांनी केले.
फोटोओळी – वेंगुर्ला येथे सुरू असलेल्या पहिल्या अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलनावेळी अॅड.डॉ.अशोक भाईडकर यांच्या ‘दशावतार‘ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.