दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर येथे इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या कु. नीरजा मनोज वेदक या विद्यार्थीनीची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली असून तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी इयत्ता सहावीपासून शासकीय नवोदय विद्यालयात प्रवेश दिला जातो. चंद्रनगर शाळेतील नीरजा वेदक या विद्यार्थीनीने या प्रवेश परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले असून ती नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरली आहे. तिला या परीक्षेसाठी शाळेतील शिक्षिका मानसी सावंत, मनोज वेदक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-प्रचाराचा-धुरळा-सुप्रि/
नीरजा वेदकची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, चंद्रनगरच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर, गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, दापोलीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव आदी अनेकांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.