शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी विमा रक्कम देण्याची आ.वैभव नाईक यांची ना.धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी; लवकरात लवकर विम्याचे पैसे देण्याचे ना. मुंडे यांचे आश्वासन
प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
कणकवली- आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या समवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलन केल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी आज मुंबई येथे मंत्रालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात आंबा व काजू पिक विमा योजनेबाबत चर्चा झाली. आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग करून गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी ना. धनंजय मुंडे यांच्याकडे केली त्याबाबतचे निवेदनही दिले. लवकरात लवकर विम्याचे पैसे देण्याचे आश्वासन ना. मुंडे यांनी आ. वैभव नाईक यांना दिले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिंदे-गटाला-भाजपचा-शह-ठा/
चर्चेदरम्यान ना. धनंजय मुंडे यांनी थेट वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्याशी याबाबत चर्चा करून नियोजन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना राज्य सरकारच्या हिस्स्याची विम्याची रक्कम विमा कंपनीला वर्ग करण्याचे सूचित केले आहे.
आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचीत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे १२० कोटी रु रक्कम प्रलंबीत आहे. गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आमदार वैभव नाईक,शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा पाठपुरावा सुरू आहे.