रत्नागिरी- भारतरत्न महर्षी तथा अण्णा कर्वे यांचे कार्य संस्था आज पुढे अविरत सुरू आहे. सामाजिक जबाबदारी, महिला सक्षमीकरणाचे काम संस्था करत आहे. डब्ल्यू-२० अंतर्गत महिला बचत गटांचे मार्केटिंग, सक्षमीकरणाचे काम सुरू झाले आहे. आज महिला बचत गटांनी त्यांची उत्पादने आणली आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत. या परिषदेचा अहवाल केंद्र शासनापर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन एसएनडीटी विद्यापीठाचे असिस्टंट डीन ऑफ स्टूडंट व एनएसएस समन्वयक डॉ. नितीन प्रभूतेंडोलकर यांनी आज शनिवारी केले. एसएनडीटी महिला विद्यापीठ लवकरच सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणून घोषित होईल. राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे प्रस्ताव गेला असून वर्षभरात सेंट्रल युनिव्हर्सिटीची घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-टोमॅटो-विकून-पुण्यातील/
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए महाविद्यालयातर्फे कडवाडकर संकुलात डब्ल्यू – २० परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. डॉ. प्रभूतेंडोलकर म्हणाले की, अण्णा कर्वेंच्या कार्याला तोड नाही. प्रसिद्धीपराङमुख काम केले आहे. १९०० च्या शतकात त्यांनी जपानला भेट दिली. तिथे महिला विद्यापीठ होते. महिलांसाठी शिक्षणाची वेगळी सोय आहे, ते पाहून त्यांनी भारतात का असू नये या विचारातून अण्णांनी १९०५ मध्ये संस्था सुरू केली. आज डब्ल्यू-२० अंतर्गत महिलांचे बचत गट त्यांना पुढे कसे आणायचे व मार्केटिंगचे काम सुरू झाले आहे. आज महिला बचत गटांनी विविध वस्तू, प्रक्रियाविरहित वस्तू विक्रीसाठी आणल्या. कोकणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत. मी वाचलेले किंवा पाहिलेले नाही. ऋण काढून सण साजरा करू नये हा विचार कोकणवासी करतात, हे महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष शिल्पा पानवलकर यांनी सांगितले की, महिला ही एक शक्ती आहे. महिलांची निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे महत्त्वाचे आहे. फक्त ऐकून नव्हे तर कृतीत आणणे गरजेचे आहे. त्याकरिता डब्ल्यू-२० चे आयोजन केले आहे. याचे आयोजन करण्याची संधी संस्थेला मिळाल्याचा अभिमान वाटतो.
व्यासपीठावर सरपंच फरिदा काझी, योजक फूड्सच्या उद्योजिका सौ. दया भिडे, आयएमए रत्नागिरी शाखेच्या अध्यक्ष, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे आणि प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर आदी उपस्थित होत्या. प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे स्वागत पुष्परोपटे देऊन केले. शाल आणि अण्णा कर्वे यांचे चरित्र देऊन सत्कार केला. दीपप्रज्वलन, आश्रमगीत, विद्यापीठाने कार्यक्रमाला सुरवात झाली. परिषदेमध्ये महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे (उमेद) समन्वयक नीलेश धमाले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सौ. ज्योती मुळ्ये यांनी केले.
डब्ल्यू- २० मधून महिला सक्षम
योजक फूड्सच्या उद्योजिका सौ. दया भिडे यांनी सांगितले की, माझ्याकडे महिला कर्मचारी आहेत. तरुणी ते ज्येष्ठ महिला अत्यंत धडाडीने काम करते. संसारासाठी काही करायचे आहे म्हणून ती नेटाने करते. डिजिटलचे ज्ञान तिच्याकडे आहे. काही वेळेला नक्की कुठच्या दिशेने जावे हे कळत नाही, मार्ग मिळत नाही. आज डब्ल्यू- २० अंतर्गत हे ज्ञान मिळेल. पुढच्या वेळेस आणखी मोठ्या संख्येने महिला येतील. स्वतःचा विकास करताना राष्ट्राचा, समाजाचा विकास करतील.
ग्रामीण महिलांकडे मॅनेजमेंट स्कील
आयएमए रत्नागिरी शाखाध्यक्ष, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे म्हणाल्या की, भारताच्या जी- २० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात देशभरात विविध प्रकारचे उपक्रम होत आहे. या अनुषंगाने महर्षी कर्वे संस्थेला डब्ल्यू- २० आयोजनाचा मान मिळाल्याबद्दल अभिमान वाटत आहे. काही वर्षांपूर्वी कोकणचे लोक मुंबईत चाकरमानी होते. त्यामुळे त्यांची पत्नी गावी राहून घरसंसार चालवते. या कोकणी महिलेचे मॅनेजमेंट स्कील मोठे आहे. कारण ती असलेल्या पैशांत घर चालवते, मुलांना शिक्षण देते. जास्त महिला महिलांनी तब्बेतीकडे पाहिले पाहिजे. आर्थिक सुबत्ता येत राहते पण तब्बेत सुधारणे शक्य नसते.
या परिषदेमध्ये महिला बचत गटांच्या सदस्य सहभागी झाल्या. दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात रत्नागिरी तालुक्यातील महिला बचत गटांच्या क्लस्टर्सच्या समन्वयिकांनी त्यांना येणाऱ्या व्यावसायिक अडचणींबद्दल मनोगत व्यक्त केले. बचत गट कोणते काम कसे करतात याची माहिती दिली. तळागाळातील महिलांचे नेतृत्व यावर चर्चासत्र झाले. डिजिटल मार्केटिंग संदर्भात रसिका पालकर यांनी आणि बीसीए कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मार्गदर्शन केले. प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी स्वागत केले. या वेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी, प्रकल्प समितीचे सदस्य उपस्थित होते. प्रतिभा लोंढे यांनी संस्थेची माहिती दिली. प्रा. निमिषा शेट्ये यांनी आभार मानले.


