प्रतिनिधी- पांडुशेट साठम
सिंधुदुर्ग- राजकोट येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटना प्रकरणात फक्त वेल्डरला अटक करून पोलिसांनी काय साध्य केले? पोलिसांवर या प्रकरणात कोणाचा दबाव आहे का? असा सवाल शिवसेना प्रवक्ते मंदार केणी यांनी केला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर अवघ्या काही तासात मुंबई पोलिसांनी हत्या प्रकरणाचा घटनाक्रम जाहीर केला. मात्र पुतळा प्रकरणी सिंधुदुर्ग पोलीस गप्प का? असा सवाल त्यांनी केला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-माहुल-येथील-वेंगसरकर/
याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभारण्यात आलेला पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.मात्र पुढच्या आठ महिन्यात तो पुतळा कोसळला आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेची मने दुखावली,व्यथित झाली. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज बांधलेले कडेकोट किल्यांचे अनेक बुरूजाचे दगड आजही जैसे थे च आहेत.मालवणच्या किल्यातील बांधकाम ४०० वर्षानंतरही समुद्राच्या लाटा झेलत अभैद्य आहे, असे असताना अवघ्या आठ महिन्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळतोच कसा?,बरं या घटनेनंतर पोलिसांनी केवळ औपचारीकता म्हणून ठेकेदार जयदीप आपटे व अधिकारी चेतन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. हे दोघेही पोलिस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत आहेत.
दुसरीकडे या घटनेत वेल्डरला पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्याला तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत ठेवले. यावेळी पोलिसांनी काय तपास केला? वेल्डरला ताब्यात घेणे म्हणजे चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे.खरं तर पुतळ्याचे हे काम २ कोटी ४४ लाख रूपयाचे होते.याची निविदा इंडीयन नेव्ही ने काढून ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली होती. त्याचे पैसे सार्वजनिक बांधकाम विभागाने नेव्ही कडे वर्ग केले होते. अशा प्रकारची ही अजब कामाची गजब निविदा होती. विशेष म्हणजे या निविदेतील अंदाजपत्रकीय रक्कमेपैकी केवळ २६ लाख रूपये ठेकेदार जयदीप आपटेला मिळाल्याचे आपटे यांनी आपल्या पोलिस जबाबात सांगितले आहे. मग उरलेली रक्कम कुणाच्या खिशात गेली?आपटे या घटनेनंतर कुणा कूणाच्या संपर्कात होता?त्याचे फोन रेकॉर्ड,सिडीआर पोलिसांनी तपासले का? तपासले तर ते रेकॉर्ड पोलिसांनी माध्यमांच्या वतीने जनते समोर का जाहिर केले नाही? माजी मंत्री बाबा सिद्यिकीच्या हत्येनंतर अवघ्या काही तासात मुंबई पोलिस सर्व घटनाक्रम जाहिर करू शकतात तर मग आमच्या महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत दुर्घटना होवून सुध्दा पोलिस प्रशासन सुस्त का? या पोलिसांवर कोणत्या राजकीय प्रमुख मंडळींचा दबाव आहे? असा सवाल उपस्थित होत असून जर पोलिस यंत्रणेवर कुणाचाच दबाव नसेल तर पोलिसांनी बाबा सिद्यिकींच्या हत्येनंतर ज्या पध्दतीने घटनाक्रम शोधून काढला व माध्यमांसमोर जाहिर केला तसाच घटनाक्रम व माहिती पोलिसांनी जाहिर करावी अशी मागणी श्री.केणी यांनी केली आहे.