🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l दापोली-
महाराष्ट्र राज्य शासनाने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगरने घवघवीत यश संपादन केले असून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या या स्पर्धेत दापोली तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. चंद्रनगर शाळेने प्राप्त केलेल्या बहुमानाबद्दल या शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. शाळेतील भौतिक सुविधा, इतर गरजा, शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शिष्यवृत्ती, नवोदय, नासा-इस्रो व इतर स्पर्धा परीक्षांमधून शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश, विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती, शालेय परिसर, इ-लर्निंग सोईसुविधा, परसबाग, शालेय बाग आदी विविध निकषांवर आधारित शाळेचे मूल्यमापन करून गुणांकन केले जाते. उच्चपदस्थ अधिकारी व त्यांचे सहकारी अशा प्रकारचे शाळेचे मूल्यमापन व गुणांकन करतात. अशा गुणांकनात चंद्रनगर शाळा दापोली तालुक्यात सरस ठरली आहे. चंद्रनगर शाळेने गेल्या काही वर्षांपासून विविध शैक्षणिक, स्पर्धात्मक व इतर उपक्रमांमध्ये सातत्यपूर्ण यश संपादन केले आहे. सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातही या शाळेचे विद्यार्थी विविध स्पर्धांमधून दैदीप्यमान कामगिरी करीत आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मालमत्ता-खरेदी-करताना/
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर व त्यांचे सर्व सहकारी, सर्व पालक, ग्रामस्थ चंद्रनगर शाळेच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील आहेत. शाळेतील शिक्षक मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत, रेखा ढमके हे उपक्रमशील शिक्षक असून त्यांच्या प्रयत्नांतून चंद्रनगर शाळेत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. याशिवाय शाळेतील सेवानिवृत्त शिक्षका अर्चना सावंत व रिमा कोळेकर यांचेही शाळेच्या प्रगतीशील वाटचालीत मोठे योगदान होते. सर्वच बाबतीत चंद्रनगर शाळेने दैदीप्यमान कामगिरी केल्यानेच या सर्वांचे फलित म्हणून चंद्रनगर शाळेने मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत दापोली तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
चंद्रनगर शाळेने प्राप्त केलेल्या या घवघवीत यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण,चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, चंद्रनगर ग्रामस्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीधर जाधव, उपाध्यक्ष सुनील रांगले, रत्ना. जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य मोहन मुळे, दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, चंद्रनगर ग्रामसेवक संदीप सकपाळ आदी सर्वांनी चंद्रनगर शाळेचे अभिनंदन केले आहे.