🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /वेंगुर्ले
महाराष्ट्रातील प्रसिद्ध रांगोळी सम्राट गुणवंत माजरेकर यांचे गुरुवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि दोन नाती असा परिवार आहे. मांजरेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे झाला. मांजरेकर यांच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. त्यांचे वडील बडोदा राजघराण्यात चित्रकार होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-राष्ट्रवादी-कॉंग्रेस-शर/
बालपण अत्यंत गरीबीत गेलेल्या मांजरेकर यांनी कोळश्याची पूड आणि दारात येणाऱ्या समुद्राच्या वाळूने रांगोळी रेखाटण्यास प्रारंभ केला. रांगोळी काढण्यात त्यांचा हातखंडा होता. अकरावीनंतर ते मुंबईत आले आणि एचपीसीएल कंपनीमध्ये नोकरीला लागले. कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी असंख्य रांगोळी प्रदर्शने भरविली होती. फकरुदीन अली अहमद, इंदिरा गांधी, राजीव गांधी, फारुख अब्दुला, एन. टी. रामराव, यशवंतराव चव्हाण इत्यादी विभूतींनी त्यांच्या रांगोळीच्या प्रदर्शनांचे उद्घाटन केले होते.
राजकारण, जागतिक संबंध, क्रिकेट, भारतीय आणि परदेशी प्रसिद्ध व्यक्ती, शिवाजी महाराज इत्यादि विविध विषयांवर त्यांनी रांगोळ्या काढल्या. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांना रांगोळी सम्राट ही पदवी दिली होती. त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन केले.