Kokan: लोकसभेच्या जागेवरून भाजप – शिंदे गटात स्पर्धा

0
46
लोकसभेच्या जागेवरून भाजप - शिंदे गटात स्पर्धा
लोकसभेच्या जागेवरून भाजप - शिंदे गटात स्पर्धा

रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात आतापासूनच चुरस लागली आहे. शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण उर्फ भैय्या सामंत तर भाजपकडून माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. रायगड-रत्नागिरी ही जागा महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे कोकणात अस्तित्व निर्माण करण्यासाठी भाजपला रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ उपयुक्त ठरू शकतो. याचसाठी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनीही वरिष्ठांकडे मागणीही केली आहे. त्यामध्ये भाजपचे नेते आमदार नीतेश राणेंनीही सामंत यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचे आवाहन केल्यामुळे चर्चेला सुरवात झाली आहे. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-भारताने-नेमबाज/

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सात विधानसभा असून, त्यामध्ये चिपळूण राष्ट्रवादीकडे, रत्नागिरी शिंदे गट शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत, राजापूर-लांजा ठाकरे गट सेनेचे राजन साळवी हे प्रतिनिधित्व करत आहेत तर सिंधुदुर्गमध्ये एक भाजप, एक शिंदे गट शिवसेना आणि एक ठाकरे गट शिवसेना असे चित्र आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. तळागाळातील संघटन मजबुतीवर भर दिला गेला आहे. त्यासाठी काही पदाधिकाऱ्यांचे बदलही केले गेले आहेत.त्यामुळे केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप यश मिळवू शकते, असा विश्‍वास पक्ष कार्यकर्त्यांना वाटतो.

माजी आमदार प्रमोद जठार यांनीही काही दिवसांपूर्वी तयारी सुरू केली होती. त्यांच्याबरोबरच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू २०२४ साठी इच्छुक असल्याच्या चर्चेला जोर धरू लागला आहे. मागील दोन महिन्यात राजापूर, रत्नागिरीमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये किरण सामंत यांचा राबता दिसू लागला आहे. मंत्री उदय सामंत यांनीही उमेदवारी मिळाली तर साडेतीन लाख मतांनी किरण यांना निवडून आणू, असा विश्‍वास व्यक्त केला आहे; मात्र स्वतः किरण सामंत यांनी तूर्त या विषयावर सावध पवित्रा घेतला आहे. भाजप आणि शिंदे सेना दोन्हीकडून आपापल्या स्तरावर उमेदवारीसाठी ताकद पणाला लावली जात आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पाठवण्यात आला आहे; मात्र नुकतेच भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपचीच असा दावा करतानाच किरण सामंत यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, असे वक्तव्य केल्यामुळे लोकसभा उमेदवारीवरून पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here